पुणे : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. पुण्यातल्या जोशी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पुनवत या त्यांच्या मूळ गावी उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेतकरी कुटुंबातले गणपतराव आंदळकर १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले.
दरबारातील मल्ल बाबासाहेब वीर त्यांना वस्ताद म्हणून लाभले. त्यांची उंची जास्त असल्यानं ते ढाक या डावावर अधिक वेळा कुस्ती करत. तसंच ते घुटनाही ठेवत. आंदळकरांनी अनेक कुस्त्या जिंकत अनेक मानाचे पुरस्कार पटकावले. १९६० मध्ये त्यांनी हिंदकेसरीची गदा पटकावली. १९६७ पासून त्यांनी कुस्ती प्रशिक्षक म्हणून नवी कारकिर्द सुरु केली. अनेक मानाच्या कुस्तींचे विजेते त्यांनी घडवले. कुस्ती क्षेत्रातल्या बहुमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारनं १९८२ मध्ये त्यांना शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवलं.