मुंबई : देशात मागील पाच दिवसांमध्ये china चीनमधून झालेल्या सायबर हल्ल्याच्या तब्बल ४० हजार प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. आयटी आणि बँक क्षेत्र चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती यातून समोर आली आहे. हे सर्व हल्ले चीनच्या चेंगडू भागातून झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं इंटरनेटचा सर्वाधिक वापर करणाऱ्यांनी या पार्श्वभूमीवर सध्या काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
भारत- चीन सीमावाद चिघळल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून बँका आणि आयटी क्षेत्रावर चिनी हॅकर्सची वक्रदृष्टी पडल्याचं स्पष्ट होत आहे. आर्थिक नुकसान, सेवा ठप्प करणं, इंटरनेट प्रोटोकॉल हायजॅक अशा पद्धतीचे हल्ले चीनकडून करण्यात येत आहेत.
भारतातील तब्बल २० लाख ईमेल आयडी वापरणाऱ्यांचा डेटाबेस हॅकर्सके असल्याची महिती राज्याच्या सायबर सेलनं दिली आहे. ncov2019@gov.in या बोगल मेल आयडीवरुन मोठ्या प्रमाणात कोविड १९ चाचणीसाठी मेल गेल्याचं उघड झालं आहे. देशात दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद अशा शहरांमध्ये या बोगस मेल आयडीद्वारे मेल पाठवण्यात आले असून, फसवणूक झाल्याची प्रकरणं उघडकीस येत आहेत. परिणामी अशा मेल आयडीवरुन तुम्हालाही मेल आल्यास सावधगिरी बाळगणं कधीही फायद्याचं ठरणार आहे.
चीनकडून होणारी सायबर हल्ल्यांची ही टोळधाड पाहता मोबाईल, लॅपटॉप अशा उपकरणांची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सायबर सिक्युरिटी ऍडव्हायजरकडून रितसर पाहणी करुन सुरक्षिततेची काळजी घेण्याचं सायबर सेलकडून सांगण्यात येत आहे. कोणत्याही गोष्टीवर क्लिक करण्यापूर्वी, मेलला उत्त देण्यापूर्वी तो लक्षपूर्वकपणे वाचूनच पुढचं पाऊल उचलून या सायबर हल्ल्यापासून आपल्या परिनं सुरक्षित राहण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.