मुंबई : शुक्रवारपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानो जोर पकडला. तर, नाशिक आणि कोकणातही पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळाला. कुठे संततधार तर कुठे मुसळधार पावसामुळे कोकणातील बऱ्याच गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे, ज्यामुळे अनेक गावं जलमय झाली आहेत.
सावित्री आणि गांधारी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे नजीकच्या सर्वतच गावांमध्ये आणि शेतजमिनींमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. नागोठणे शहरालाही पूराने वेझलं आहे. येथील बाजारपेठ, एस टी स्थानक, आगार, कोळीवाडा , मोहल्ला परिसरात पुराचं पाणी घुसलं आहे. रामराज, अंतोरे गावातही पुराचं पाणी गेल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाली येथील पुलावर पाणी आल्यामुळे वाकण - खोपोली वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, सावित्री नदीवरील दादली पूल एकंदर परिस्थिती पाहता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्यण घेण्यात आला आहे. माणगावमध्येही पूराच्या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. पूराच्या या परिस्थितीतून आतापर्यंत एकूण ६० ग्रामस्थांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसाचं एकंदर चित्र आणि हवामान खात्याकडून सध्या वर्तवण्यात आलेला अतिवृष्टीचा अंदाज पाहता प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय पूरपरिस्थितीशी लढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज आहेत.