नाशिक शहरात पुन्हा मुसळधार पाऊस

नाशिक शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.  

Updated: Oct 28, 2019, 06:29 PM IST
नाशिक शहरात पुन्हा मुसळधार पाऊस title=
संग्रहित छाया

नाशिक : शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जर संततधार पाऊस पुढील दोन दिवस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आधी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा पावसाने नुकसान झाले तर शेतकरी पुरता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आज पुन्हा अचानक पाऊस आल्याने शहरातील व्यवसायिकांची तारांबळ उडाली आहे.

ऐन सणासुदीच्या तोंडावर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानं बाजारात ग्राहकांची संख्या कमी प्रमाणात असल्याचे चित्र आहे. नाशिकच्या मुख्य रस्ता, गाडगे महाराज पुतळ्याजवळ इतर वेळेला देखील ग्राहकांची वर्दळ असते. मात्र शनिवार आणि रविवारी शहरात रिमझिम पाऊस असल्याने ग्राहक बाजारात येण्यास फारसा उत्साह दिसला नाही. काही भागात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. त्यात शेतमाल सडल्याने बाजारसमितीत येणाऱ्या शेतमालाची आवक घटलीय.

निवडणूक आणि दिवाळी एकाच काळात आल्याने दीवाळीच्या तोंडावरील विकेंड देखील विक्रेत्यांच्या दृष्टीने फारसा चांगला नाही. ग्राहक कमी प्रमाणात येत असल्याने वरून राज्याने विश्रांती घ्यावी आणि ग्राहकांनी बाहेर पडावे, अशी अपेक्षा विक्रेत्यांकडून केली जात होती. मात्र, नाशिकमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांसह शेतकरी चिंतेत आहे.

पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस नाशिक शहरातही पडल्याने गंगापूर धरण समूहातून तसेच इतर धरणातून पुन्हा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली होती. याचा फटका नदी किनारी भागातील घरांना बसला होता. यावेळी तीन बळी गेले होते तर काही जनावरे जखमी झाली होतीत. तर काढणीला आलेल्या कांद्यामध्ये पाणी शिरले असल्याने शेतकऱ्यांचं यामुळे नुकसान झाले होते.