सांगली : अकोला शहरात उन्हाचे चटके असह्य झाले आहेत. सलग तिस-या दिवशी अकोला शहरात पारा 44 अंशांच्या पुढे आहे. अकोल्यात काल 44.2 अंश तापमानाची नोंद झालीय. 44.2 हे तापमान जगात सर्वाधिक तापमान म्हणून नोंदवलं गेलं आहे. आठच दिवसांपूर्वी अकोल्याची जगातल्या पहिल्या 10 सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये नोंद झाली होती. उष्णतेच्या बाबतीत नायजरमधलं बिरनी शहर दुस-या स्थानी होतं. तर पाकिस्तानातलं जेकोबाबाद तिस-या स्थानी होतं.
दुसरीकडे कोल्हापूरपाठोपाठ सांगली जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली. मिरज शहरात वादळी वा-यांसह गारांचा पाऊस पडला. यामुळे शहरात गारांचा खच बघायला मिळाला. सलग तिस-या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. यामुळे द्राक्ष पीक धोक्यात आलं असून शेतकरी चिंतेत आहेत. या अवकाळीचा गहू, हरभरासह, कलिंगड, आंब्यालाही फटका बसला आहे. पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. तर अनेक घरांवरील पत्रेही उडून गेले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जोरदार गारपीट झाली आहे. तर कोल्हापूर शहरातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गारपिटीमुळे शेतक-यांना मोठा फटका बसला आहे.