हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर : पुणे-नगर महामार्गाला धोका निर्माण झाला आहे. नियम धाब्यावर बसवत कोंढापुरी इथे भूमिगत गॅस पाईपलाईनचे काम जोरात सुरू करण्यात आलं आहे. पुणे-नगर महामार्गालगत औद्योगिक वसाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो, याच महामार्गालगत गँस पाईपलाईनचे काम सुरु असून रस्त्याच्या मध्यभागापासून १५ मीटर अंतरावर खोदण्याचा नियम असताना सर्व नियम धाब्यावर बसवत खोदकाम सुरु आहे.
याबाबत मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी गॅस कंपनीवर कारवाई करण्यां लेखी आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र कारवाई न होता या मार्गावर पुन्हा जोरात काम सुरु झालं आहे. त्यामुळे हे काम तातडीने बंद करुन कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होते आहे.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणची पाहणी करून नियमांचे उल्लंघन झाल्याचं सांगत कंपनीला दंड ठोठावल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता तरी या कंपनी प्रशासनाला जाग येणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वाहतूक नियम असतात मग ज्या महामार्गावरून प्रवासी प्रवास करतात त्याच महामार्गाला जर धोका पोहोचवण्याचं काम सुरू असेल तर फक्त दंड करून हा प्रश्न सुटणार आहे का? आणि येत्या काळात जर याठिकाणी कुठला मोठा धोका उद्भवला तर याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.