अटल सेतूला खरचं भेगा पडल्यात का? नाना पटोले यांच्या आरोपानंतर स्ट्राबॅग कंपनीच्या अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

अटल सेतूच्या रस्त्यालाच उलवे येथिल मार्गावर मोठमोठाल्या भेगा पडलेत. त्यामूळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून विरोधक आक्रमक झालेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतूच्या कामाचा हा असा पंचनामा करत सागरी सेतूच्या कामावर प्रश्न उपस्थित केलेत. 

वनिता कांबळे | Updated: Jun 21, 2024, 07:59 PM IST
अटल सेतूला खरचं भेगा पडल्यात का? नाना पटोले यांच्या आरोपानंतर स्ट्राबॅग कंपनीच्या अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा  title=

Cracks On Atal Setu : मुंबईतल्या अटल सेतूसाठी तब्बल 18 हजार कोटींचा खर्च करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जानेवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सागरी सेतूचं उद्घटन केलं होतं. एल अँड टी, टाटा आणि मेसर्स स्ट्रॅबॅग या तीन कंपन्यांनी अटल सेतुचं काम पूर्ण केलंय. ज्या ठिकाणी हा रस्ता खचलाय त्या कामाची जबाबदारी ही मेसर्स स्ट्रॅबॅग कंपनीवर होती. रस्त्यालगत खाडी असल्यामुळे या ठिकाणी रस्ता खचल्याचं स्ट्राबॅग कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणण आहे.

कंपनीचा खुलासा

अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून विविध माध्यमांतून त्याबाबत अफवा पसरवल्या  जात असल्याचे निदर्शनास आले आहे.कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका.  अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोचमार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत.  सदर पोहाचमार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नसून त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  
प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने 20 जून 2024 रोजी केलेल्या तपासणीदरम्यान, उलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक 5 अस्फाल्टवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या असून त्या त्वरीत दुरूस्त करण्यासारख्या आहेत. अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज ४ चा कंत्राटदार, मेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने सदर भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता24 तासांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.अटल सेतूवर ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत, त्या आता भरण्याचं काम सुरु झालंय.. मात्र हजारो कोटींच्या अटल सेतू प्रकल्पाच्या अशा पद्धतीने वाजलेले तीनतेरा अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहेत.

नाना पटोले यांचे गंभीर आरोप 

महत्वाचे म्हणजे या प्रकल्पातील काही सर्व्हिस रोडला पर्यावरणाची परवानगी ही नसल्याची माहिती मिळतेय. 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतुची पाहणी करून रस्त्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारने १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असून सरकार स्वतःची घरे भरत आहे आणि जनतेच्या जीवाशी खेळत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या प्रकल्पाला दिले आहे, त्यांच्या नावाने भ्रष्टाचार करणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटनाआधी त्यांनी या प्रकल्पाची व्यवस्थित पाहणी तरी करायला हवी होती. पण नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपात घेऊन मंत्री बनवतात.  

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे, एक टेकडीही फोडली असून पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. वसईच्या खाडीत पाईप लाईनचे काम सुरु असताना एक गरिब कामगार 20 मीटर खाली दबला गेला, त्याच्यावर हजारो किलो लोखंड पडले. मा. उच्च न्यायालयाने या सर्व घटनांमध्ये स्वतः लक्ष घालावे असे म्हणत हे सर्व प्रकार मुख्यमंत्री शिंदे यांच्याच खात्यात होत आहेत. सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारी सरकारला अधिवेशनात जाब विचारेल, असेही नाना पटोले म्हणाले.