Haryana Vidhan Sabha Election Result Warning For Congress: "हरियाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजप-काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. हरियाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वास व स्थानिक नेत्यांच्या अरेरावीमुळे होताना दिसत आहे," असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन राज्यांमधील निवडणुकांची कारणमिमंसा केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं सूचक पद्धतीने राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला आहे.
"हरियाणात पुन्हा भाजपचे सरकार येईल असे कुणीच ठामपणे म्हणत नव्हते. काँग्रेसचा विजय एकतर्फी होईल असे एकंदरीत वातावरण होते; पण जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकावे लागेल. हरियाणात भाजपविरोधी वातावरण होते. भाजपच्या मंत्र्यांना व उमेदवारांना हरियाणातील गावात घुसू देत नाहीत असा माहोल होता. तरीही हरियाणाचे निकाल काँग्रेसच्या विरोधात गेले," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. तसेच लेखात पुढे, "त्याच वेळी जम्मू-कश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने बहुमत मिळवले व भाजपच्या स्वप्नाच्या ठिकऱ्या उडवल्या. कश्मीरातील जनता मोदी-शहांनाच मतदान करेल असे ढोल वाजवले जात होते. पाच वर्षांपूर्वी 370 कलम हटवून अमित शहांनी जणू क्रांतिकारक पाऊल टाकल्याचे जाहीर केले. कश्मीरातून 370 कलम हटवून अखंड भारताचे स्वप्न साकार केल्याचा आव मोदी-शहा आणत होते, पण कश्मीरातील दहशतवाद त्यांना संपवता आला नाही. तरुणांना रोजगार देण्यात मोदी-शहा तोकडे पडले. मुख्य म्हणजे, हजारो कश्मिरी पंडितांची घरवापसी मोदी-शहा करू शकले नाहीत. 370 कलम काढणे हा फार्स ठरला व आता तेथील जनतेने भाजपचा पराभव केला," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
"हरियाणात काँग्रेस व जम्मू-कश्मीरात भाजपला अशातऱ्हेने धक्का बसला. पंतप्रधान मोदी यांना कश्मीरच्या जनतेने झिडकारले व हरियाणात स्थिती अनुकूल असतानाही काँग्रेसला फायदा घेता आला नाही. काँग्रेसच्या बाबतीत हे नेहमीच घडते. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेवर येणार नाही असे पक्के वातावरण मागच्यावेळी होते, पण काँग्रेस पक्षाची अंतर्गत सुंदोपसुंदी भाजपच्या पथ्यावर पडली. हरियाणात मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी काँग्रेस पक्षाची नौका डुबवली काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसचे सूत्रधार आपणच व आपण ठरवू तेच उमेदवार अशी हुड्डा यांची भूमिका होती. पक्षातील कुमारी सेलजा यांच्यासारख्या नेत्यांचा जाहीर अपमान हुड्डा तसेच त्यांच्या लोकांनी केला व काँग्रेसचे दिल्लीतील हायकमांड हुड्डा यांना रोखण्यात अपयशी ठरले," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
"हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मोठे आंदोलन केले. हरियाणातील महिला कुस्तीपटूंच्या विनयभंगावर भाजपने व त्यांच्या पंतप्रधानांनी कोणतीच कारवाई केली नाही. विनेश फोगाट व तिच्या सहकाऱ्यांना दिल्लीतील जंतरमंतर रोडवरून फरफटत पोलीस व्हॅनमध्ये कोंबले; या सगळ्याची चीड हरियाणातील जनतेत स्पष्ट दिसत होती. अर्थात विनेश फोगाट स्वतः जिंकली तरी तिच्यावरील अन्यायामुळे हरियाणात सर्वदूर निर्माण झालेल्या संतापाचा, नाराजीचा फायदा काँग्रेसला झाला नाही. हरियाणात भाजपविरोधी लाट होती व त्या लाटेत भाजप वाहून जाईल असे सांगितले जात होते, पण तसे घडले नाही. कारण काँग्रेसचे संघटन विस्कळीत व हतबल होते. राजकारणात व निवडणुकीत संघटन जमिनीवर असावे लागते. भाजपचे संघटन मजबूत होते व ‘स्ट्रटेजी’ बिनचूक ठरली. मध्य प्रदेशात कमलनाथांनी भाजपला सरळ मदत केली. हरियाणात हुड्डा यांच्या मागेही केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा होता, तरीही हुड्डा हे काँग्रेसबरोबरच राहिले. हरियाणातील जाट समुदायाचे ते मोठे नेते, पण इतर समाजाला ते काँग्रेसबरोबर उभे करू शकले नाहीत. जाट विरुद्ध इतर समाज असा हा सामना झाला व त्यात भाजपने बाजी मारली," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
"पुन्हा हरियाणातील भाजप विजयात बलात्काराच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आणि काही दिवसांपूर्वी ‘पॅरोल’वर सुटून बाहेर आलेल्या बाबा राम रहीम याचाही ‘वाटा’ आहेच. हा बाबा नेमका निवडणुकीच्या काही दिवस आधी ‘पॅरोल’वर कसा सुटतो? याआधीच्या निवडणुकांतही बाबा राम रहीमचे हे‘निवडणूक कनेक्शन’ दिसून आले हेते. निकालाच्या एक दिवसापूर्वीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सांगितले होते की, “भाजपच जिंकेल. आम्हीच जिंकू याचा सर्व बंदोबस्त केला आहे.’’ सैनी यांचे हे विधान रहस्यमय आहे. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर होती. काँग्रेसने ठिकठिकाणी जिलेब्या-लाडू वाटायला सुरुवात केली; पण पुढच्या तासाभरात भाजपने आघाडी घेतली व काँग्रेस पिछाडीवर गेली. निवडणूक आयोगानेही नंतर मतमोजणीची गती मंद केली. हे का घडले? काँग्रेसची सर्वत्र आघाडी दिसत असताना मतमोजणी आणि त्याविषयीचे ‘अपडेटस्’ यांची गती अचानक कमी का झाली?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने उपस्थित केला आहे.
"काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी त्यावरून निवडणूक आयोगावर आरोपही केले आहेत. हरियाणातील भाजपचा विजय म्हणूनच संशयास्पद ठरला आहे. तेव्हा मोदी व शहा यांनी हरियाणाच्या विजयाने हुरळून जाऊ नये. कारण महत्त्वाचे राज्य असलेल्या जम्मू-कश्मीरात त्यांचा पराभव झाला आहे. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे नेते नाहीत हाच त्याचा अर्थ. हरियाणा आणि जम्मू-कश्मीरचे निकाल दिशादर्शक आहेत. उद्या महाराष्ट्रात निवडणुका होतील. महाराष्ट्रातील जनता हरियाणाच्या मार्गाने जाणार नाही व महाविकास आघाडी महाराष्ट्रात विजयी होईल. मोदी-शहा, फडणवीस-मिंधे यांच्या विरोधात मराठी जनमत आहे. महाराष्ट्राची बाजी महाविकास आघाडीच जिंकणार, पण राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हरियाणातील निकालापासून शिकावे असे बरेच काही आहे. हरियाणात काँग्रेसने ‘आप’सह अनेक घटकांना दूर ठेवले. कारण सत्तेत त्यांना वाटेकरी नको होते. या खेळात संपूर्ण राज्यच हातचे गेले. जम्मू-कश्मीरमध्ये ‘इंडिया’ आघाडीचा विजय झाला. हरियाणात फक्त काँग्रेसची पीछेहाट झाली. हे चित्र ‘इंडिया आघाडी’साठी बरे नाही, पण लक्षात कोण घेणार?" असं सूचक विधान लेखाच्या ठाकरेंच्या पक्षाने केलं आहे.