बीड : ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होताच गावचं राजकारण तापलं, उमेदवारांसाठी शोधाशोध सुरू

जिल्ह्यातील मोठे नेतेही लागले कामाला, Dhananjay Munde आणि Pankaja Munde यांच्यात पुन्हा रस्सीखेच... जनतेमधून थेट निवडणूकीचा फायदा कोणाला?

Updated: Nov 21, 2022, 09:14 PM IST
बीड : ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होताच गावचं राजकारण तापलं, उमेदवारांसाठी शोधाशोध सुरू title=

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : बीडचा प्रमुख व्यवसाय काय जर म्हटलं तर उत्तर येतं राजकारण. कारण या जिल्ह्यामध्ये 365 दिवस राजकारणावर चर्चा करणारी आणि राजकारणात व्यस्त असणारी मंडळी पाहायला मिळतं. बीड जिल्ह्यात असं एक ही गाव नाही जिथे राजकारणाची चर्चा होत नाही. एकही घर नाही तिथे कुठल्या प्रमुख पक्षाचा कार्यकर्ता सापडणार नाही. कारण बीड जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पक्षांमध्ये विचारधारेची काम करणारी मंडळी सक्रिय पद्धतीने राजकारणामध्ये काम करताना पहायला मिळतात. बीड जिल्ह्याने आतापर्यंत डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसचे, भाजपचे अशा सर्वच पक्षांच्या नेत्यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं आहे.
 
त्यामुळे सर्व विचारधारेचे आणि पक्षातील लोक जिल्ह्यामध्ये सक्रिय पद्धतीने काम करताना पाहायला मिळतात. कुठल्या ना कुठल्या पदावर यावं यासाठी ते प्रयत्नशील असतात. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत यामध्ये किमान सदस्य आणि जनतेतून थेट सरपंचपद मिळावं यासाठी अनेक जणांनी कंबर कसलीय.

बीड जिल्ह्यामध्ये 700 हून अधिक ग्रामपंचायती
बीड जिल्ह्यात 700 हून अधिक ग्रामपंचायतसाठी निवडणुका होणार आहेत. जनतेमधून थेट निवडणूक असल्यामुळे याचा फायदा भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांना होईल असा अंदाज बांधला जातोय. कारण थेट निवडणुकीमध्ये मागच्या काळातही भाजपला फायदा झाला होता. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्ह्यामध्ये सक्रिय पद्धतीने काम करताना पाहायला मिळतायत. दोन्ही पक्ष आपल्याकडे जास्त ग्रामपंचायतचा संख्याबळ असेल यासाठी प्रयत्न करताना दिसतायत.

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 28 नोव्हेंबर
ग्रामपंचायत उमेदवारी साठी 28 नोव्हेंबर तारीख ठरली आहे. मात्र त्या अगोदर मुख्य सरपंच पदासाठी आणि सदस्य पदांसाठी लॉबिंग होताना पाहायला मिळत आहे. गावातल्या राजकारणामध्ये कोण कुठल्या पक्षात आहे आणि कोण कसा पॅनल तयार करून निवडणूक लढत यातील सध्या त्याच्या सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक जण आपला आपला उमेदवार हा तगडा असावा यासाठी चांगल्या उमेदवाराची चाचपणी करत आहेत. तर थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक असल्यामुळे निवडून येणारा उमेदवार हा आपल्याच गटाचा असावा या साठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. अनेक जण पेनल न करता थेट नशीब अजमावण्याच्या तयारीत आहेत.

फॉर्म भरण्याआधीचे सहा दिवस महत्त्वाचे
कोण कुठल्या गटात, कोण कुठल्या पॅनलमध्ये आणि मुख्य सरपंचपदाचा उमेदवार कोण असेल यासाठी प्रत्येक गावामध्ये सध्या रसीखेच सुरू आहे. गावाच्या पारावर, नाकानाक्यावर, हॉटेलवर जिथे तिथे संदर्भातल्या चर्चा रंगत आहेत.  वर्षांनवर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती, मात्र गावासाठी काहीही करू शकले नाही तेही गुडघ्याला बाशिंग लावून आहेत. तर नवंतरुणांना संधी मिळावी, नवतरुणांनी राजकारणामध्ये घेऊन गावाचा विकास करावा यासाठीही काही जण प्रयत्न करताना दिसत आहेत. या सात दिवसांमध्ये गावागावांमध्ये कसे पॅनल निर्माण होतात यावरच गावचा विकास होणार की नाही हे ठरणार आहे.

बडे नेते ही लागले कामाला
ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्या तरी बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकारण्यांनी यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे, भाजपकडून पंकजा मुंडे यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस, गेवराईतील पंडित कुटुंब यांच्यासह आजी-माजी मंत्री आणि आमदार आपल्या पक्षाकडे जास्तीत जास्त ग्रामपंचायत राहतील यासाठी कामाला लागले आहेत