Crime News : मृत्यूची अफवा पसरली अन् जमावाने पोलिसांना... गोदिंयातील धक्कादायक प्रकार

Gondia News : बैगलगाडा स्पर्धा सुरु असताना एक अफवा पसरली आणि तुफान दगडफेक सुरु झाली. या दगडफेकीमध्ये पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 52 जणांवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे

Updated: Mar 7, 2023, 12:27 PM IST
Crime News :  मृत्यूची अफवा पसरली अन् जमावाने पोलिसांना... गोदिंयातील धक्कादायक प्रकार title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : राज्यात सध्या बैलगाडा स्पर्धांचा (bail gada sharyat) जोर वाढलेला दिसत आहे. विदर्भातील (Vidarbha) काही शंकरपट म्हणून या बैलगाडा स्पर्धा ओळखल्या जातात. काही ठिकाणी या शंकरपट स्पर्धेला गालबोट लागल्याचा पाहायला मिळत आहे. गोंदिया (Gondia) जिल्ह्याचा सडक अर्जुनी तालुक्यातील केसलवाडा येथे इनामी शंकरपटाला गालबोट लागले आहे. या स्पर्धेदरम्यान एका इसमाच्या मृत्यूच्या अफवेमुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. मृत्यूची अफवा परसताच जोरदार दगडफेक झाली. यामध्ये पोलिसांनाही (Gondia Police) लक्ष्य करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी 52 लोकांवर गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

विदर्भातील मोठ्या अशा इनामी शंकरपटाचे आयोजन केसलवाडा येथे करण्यात आले होते. हा शंकरपट पाहण्यासाठी परिसरातील शेकडो नागरिकांनी व पटशौकीनांनी प्रचंड गर्दी केली होती. विशेष म्हणजे या पटाची स्पर्धा जिंकणाच्या स्पर्धकाला  7 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्कंठा होती. शंकटरपटातील शेवटच्या जोड्या सुटण्याची वाट पाहत असताना नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्याच दरम्यान हा सर्व प्रकार घडला.

ही गर्दी पांगविण्यासाठी पटसमितीचे अध्यक्ष राजकुमार हेडाऊ यांनी काठीचा वापर केला. यामध्ये चंद्रहास परशुरामकर (22 रा. खोडशिवनी) याच्या डोक्यावर काठी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची अफवा शंकरपटामध्ये पसरली. या सर्व प्रकारामुळे वातावरम तापलं. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पटसमितीच्या स्टेजच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली. हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी थेट वाहनाचा वापर केला आणि गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने त्यांच्या वाहनावरही दगडफेक केली.

शेवटी पट बंद केल्यानंतर हा सर्व प्रकार थांबला. पोलीस हवालदार हरिश्चंद्र पंढरी शेंडे यांच्या तक्रारीवरून 52 लोकांवर डुग्गीपार पोलिसांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 3, सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.