अमर काणे, झी मीडिया, नागपूर : लग्नास नकार दिल्याने संतप्त प्रियसीने चाकूने वार करून प्रियकराची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलेली आहे. नागपूरच्या वाडी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
अक्षय ढोके असे या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर पूजा असे हल्लेखोर प्रेयसीचे नाव आहे. अक्षय एका खाजगी कंपनीत कामाला आहे.पूजा घटस्फोटीत आहे.
गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पूजा अक्षयला लग्न करण्यासाठी म्हणत होती, तर अक्षय मात्र त्यावरून टाळाटाळ करत होता यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे अक्षयने तिच्याशी बोलणे ही बंद केले होते. तसेच तिचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केला होता.
त्यामुळे संतापाच्या भरात सोमवारी रात्री पूजा अक्षयच्या वाडी परिसरातील निवासस्थानी पोहचली. तिथे चाकूने सपासप अक्षयवर वार केले. पूजाने अक्षयच्या मानेवर, गालावर, मनगटावर, मांडी आणि पाठीवर चाकुने वार केले आहेत. जिवाच्या आकांताने ओरडत अक्षय एक किलोमीटरपर्यंत जखमी अवस्थेतच पळत गेला. स्थानिकांनी जखमी अक्षयला खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, प्रेयसी पूजाला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर यांनी दिली आहे.