Gautami Patil Surname Issue : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या नृत्यांगना धुमाकूळ घातल्यानंतर काल (25 मे 2023) विरारमध्ये आली होती. विरारमध्ये पहिल्यांदाच गौतमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती.
अगदी वसई, नालासोपाऱ्यातून प्रेक्षक गौतमीचा कार्यक्रम पाहायला आले होते. त्यामुळे नेहमी प्रमाणे पोलिसांना प्रेक्षकांना आवरता आवरता नाकीनऊ आले होते. यावेळी गौतमी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तिच्या पाटील या आडनावाला मराठा महासंघाने (Maratha Organizations) विरोध दर्शविला आहे. आता तिने पाटील आडनाव लावू नये, असा इशारा तिला देण्यात आला आहे. शिवाय त्यासंबंधीची एक बैठक ही पुण्यात झाली. मात्र यावर आता थेट गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.
गौतमीचं खरं नाव पाटील नसून चाबुकस्वार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाटील हे आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते, असा आरोप तिच्यावर आहे. तिने पाटील आडनाव लावू नये, अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयक राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. त्यावर गौतमी पाटील हिने थेट आव्हान देणारचं उत्तर दिले आहे.
गौतमी पाटील म्हणाली, कोण काय बोलतयं याने मला काही फरक पडत नाही. मी माझे काम करत राहणार. मी पाटील आहे आणि पाटीलच नाव लावणार...तसेच गौतमीने यावेळी आपल्या टीकाकारांना आवाहनही केले आहे. माझ्या कार्यक्रमावरुन ज्या कोणाला प्रश्न असतील त्यांनी माझा कार्यक्रम पाहायला यावे आणि माझा कार्यक्रम त्यांनी पूर्ण पाहावा, असे गौतमी पाटील म्हणाली.
गौतमी पाटील हिचा कार्यक्रम काल, 26 मे ला विरार पुर्वेकडील खर्डी येथे होता. प्रभाकर पाटील यांच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर तिच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. त्यानंतर तिने स्टेजजवळ महिलांसोबत फुगड्याही घातल्या. त्यानंतर रात्री 9 वाजता गौतमीच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली.यावेळी पालघर जिल्ह्यातील हजारो नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.
ज्या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम होतो,तिथे राडा होणार. शेकडो पोलिसांचा बंदोबस्त असतानाही तरुणाईचा होणारा राडा हा सोशल मीडियावर व्हायरल होतो.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गावकऱ्यांनी गौतमीचा कार्यक्रम असेल तर कडक धोरण अवलंबले जाते. म्हणजेच तिचा कार्यक्रम गावात होऊ देऊ नका, गौतमीचा कार्यक्रम गावात घ्यायचा असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असे नियम करण्यात आले आहेत. त्यातच आता गौतमीची आडनावावरुन वादंग पेटला आहे.