अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : शहरातले पाळीव प्राणी आणि भटके प्राणी, मृत पावल्यानंतर त्यांची विल्हेवाट कुठे लावायची हा नेहमीचाच प्रश्न. पुणे महापालिकेनं मात्र त्यावर उत्तम उपाय शोधलाय. मृत पावलेल्या लहान प्राण्यांची विलेव्हाट लावण्यासाठी महापालिकेतर्फे अत्याधुनिक अशी गॅस दाहिनी उभारण्यात आलीय. माणसांप्रमाणे प्राण्यांवर अंत्यसंस्कार होतातच असं नाही, मृत पावल्यानंतर त्यांची जमेल तिथे जमेल तशी विल्हेवाट लावली जाते. कधी त्यांना जमिनीत पुरलं जातं तर कधी उकिरड्यावर किंवा मोकळ्या जागेवर तसंच फेकून दिलं जातं. त्यातून पर्यावरण, प्रदूषण आणि आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. मृतदेहाची हेळसांड होते तो भाग निराळाच... या पार्शवभूमीवर पुणे महापालिकेनं नायडू रुग्णालयाच्या परिसरात मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी गॅस दाहिनी उभारलीय.
कुत्रे, मांजरं आणि इतर छोट्या प्राण्याचं दहन इथं करता येणार आहे. एकाचवेळी २ ते ३ छोटया प्राण्यांचं दहन इथं शक्य होणार आहे. महत्वाचं म्हणजे त्यामधे कुठल्याच प्रकारचं प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्यात आलीय.
प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी असावी आणि तिथे अत्याधुनिक दाहिनीची सोय उपलब्ध असावी अशी प्राणीप्रेमींची मागणी होती. पुण्यात दिवसाला किमान २५ ते ३० छोट्या प्राण्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे महापालिकेनं उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचं नागरिकांनी स्वागत केलंय.
या गॅस दाहिनीची चाचणी यशस्वी झालीय. येत्या ३१ मे ला तिचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या स्मशानभूमीच्या उभारणीसाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. लवकरच मोठ्या प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी अशा प्रकारची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.