बॉस इज बॅक! तुरुंगातून सुटताच कुख्यात गुंडाची रॉयल मिरवणूक; पण पुढच्याच क्षणी नको ते घडलं

एमपीडीए अंतर्गत कारागृहात असणाऱ्या हर्षद पाटणकरची (Harshad Patankar) नुकतीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून (Nashik Road Central Jail) सुटका करण्यात आली होती. यानंतर त्याच्या समर्थकांनी चक्क मिरवणूक काढली होती.   

शिवराज यादव | Updated: Jul 26, 2024, 03:32 PM IST
बॉस इज बॅक! तुरुंगातून सुटताच कुख्यात गुंडाची रॉयल मिरवणूक; पण पुढच्याच क्षणी नको ते घडलं title=

नाशिकमध्ये गुंडाची कारागृहातून सुटका करण्यात आल्यानंतर चक्क मिरवणूक काढल्याची घटना समोर आली आहे. हर्षद पाटणकरच्या (Harshad Patankar) समर्थकांनी शहरात जंगी मिरवणूक काढली. पण ही मिरवणूक काढणं हर्षद पाटणकरला महागात पडलं. याचं कारण जंगी मिरवणूक काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा हर्षद पाटणकरला बेड्या ठोकल्या. त्याच्यासह त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. 

नाशिकचा गँगस्टर हर्षद पाटणकरला एमपीडीए अंतर्गत अटक करण्यात आली होती. 23 जुलैला त्याची सुटका करण्यात आली. यानंतर हर्षद पाटणकरच्या समर्थकांनी सुटकेचं सेलिब्रेशन कऱण्यासाठी कार रॅली काढली. शरणपूर परिसरातील काढण्यात आलेल्या या रॅलीत 15 दुचाकी सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत तडीपार गुंड, सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांचाही सहभाग होता. या मिरवणुकीत चारचाकी महिंद्र एक्सयुव्ही 300 ही होत्या. 

शरणपूर रोडवरील बैथेल नगर ते आंबेडकर चौक, साधू वासवाणी  रोड, शरणपूर रोड परिसरातून हर्षद पाटणकरची मिरवणूक काढण्यात आली होती. या घटनेनंतर सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पोलिसांचा गुंडांवर काही वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य विचारु लागले होते. 

या जंगी मिरवणुकीदरम्यान जोरजोरात हॉर्न वाजवण्यात आले होते. तसंच शिवागीळदेखील केली जात होते. तसंच बॉस इज बॅकच्या घोषणाही दिल्या जात होत्या. या मिरवणुकीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली. मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

व्हायरल व्हिडीओत हर्षद पाटणकर कारच्या सनरुफवरुन समर्थकांना हात दाखवत असल्याचं दिसत आहे. दरम्यान ही रील व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत करत पुन्हा एकदा हर्षद पाटणकरला अटक केली. त्याच्या सहा साथीदारांनाही अनधिकृत रॅली काढल्याबद्दल आणि अराजकता निर्माण केल्याबद्दल अटक केली आहे.