अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरमध्ये अवघ्या १२ तासांत दोन हत्या झाल्या. राहुल पावसकर या तडीपार गुंडाची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत तरूणाची दगडाने ठेचून हत्या कऱण्यात आली. अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांमुळे नागपूर हादरले. कुख्यात गुंड राहूल पावसकरची हत्या गुरूवारी रात्री पडोळेनगर परिसरात झाली. राहुलला नागपुरातून हद्दपार करण्यात आलं होतं. तरी तो नागपुरात मोकाट फिरत होता. अनैतिक संबंधातून राहुलची आकाश देशभ्रतार, आकाश मंडल आणि दिनेश गुणेकर यांनी कट रचून हत्या केली.
तडीपार राहुल पावसकर कोणाच्या आशीर्वादाने नागपुरात मोकाट फिरत होता, हा प्रश्न उपस्थित होतोय. या हत्येला काही तास उलटत नाहीत तोवर रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात तरूणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित झालंय.