आशीष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली : जिल्ह्याच्या ऐटापल्लीच्या ताडगाव-कसनूर जंगलात सुरक्षादलाला मोठं यश लाभलं आहे. पोलिसांची या भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. हा नक्षलग्रस्त भाग आहे. पोलिसांनी अॅन्टीनक्षल मोहिमेखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेली ही कारवाई मागील ४ वर्षांपासूनची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या आधी देखील ३ एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ३ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलं होतं. ज्यात २ महिलांचा समावेश होता. नक्षलींविरोधातली आतापर्यंतची ही मोठ्ठी कारवाई मानली जात आहे. नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस उपमहारीक्षक अंकुश शिंदे यांची ही माहिती दिली आहे.
मीड़िया रिपोर्टनुसार, गडचिरोलीत झालेल्या चकमकीत नक्षल म्होरक्या साईनाथ आणि सीनू देखील मारले गेले आहेत. पोलिसांचं हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे. महाराष्ट्र पोलीस मागील काही दिवसांपासून सक्रिय नक्षलग्रस्त भागात विशेष मोहिम चालवत आहेत. या भागात ग्रामीण आणि नक्षलवाद्यांमध्ये संघर्षाच्या घटना घडत असतात.
देशात सध्या नक्षलवाद्यांच्या कारवाया तशा आधीच्या मानाने कमी झालेल्या आहेत. देशातील १२६ नक्षलग्रस्त जिल्ह्यांपैकी ४४ जिल्हे नक्षलमुक्त असल्याची घोषणा सरकारने केली आहे, मात्र दुसरीकडे ८ जिल्हे नव्याने नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत आले आहेत. बिहार आणि झारखंडमधील ५ जिल्हे संवेदनशील नक्षल जिल्ह्यातून मुक्त झाले आहेत.