जितेंद्र शिंगाडे, अमर काणे, झी मीडिया नागपूर : नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले आहेत. गुन्हेगारांनी शहरात थैमान घातला असून हत्या, लुट, घरफोडीच्या घटनां सातत्याने घडत आहे. गेल्या दोन दिवसात हत्येच्या चार घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. रविवार आणि सोमवारी झालेल्या हत्येच्या घटनांनी नागपुरात खळबळ उडाली. पंकज विंचुरकर या थोरल्या भावाची नीरज विंचूरकर या धावट्या भावाने हत्या केली. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मॉडेल मिल इथे विंचुरकर कुटुंबाचं निवासस्थान आहे. दारूच्या व्यसनामुळे आई आणि भावाशी पंकजचे सातत्याने वाद होत असत. दारू पिण्यासाठीच्या पैशातून मंगळवारी पहाटे वाद झाला आणि त्यातून नीरजने पंकजवर दगडाने प्रहार करत हत्या केली.
सोमवारी नागलवाडी परिसरात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. ओढणीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. तर पूर्व वैमनस्यातून कृष्णा उर्फ डब्बा सुखारी प्रसाद या तरूणाची संतोष उर्फ हड्डी याने साथीदारांच्या मदतीने हत्या केली.
मसाळा गावात सोमवारी जमिनीच्या वादातून भोयर पितापुत्राला कारोकार कुटुंबीय व त्यांच्या सहका-यांनी काठ्या व लोखंडी पाईपने माराहण केली. यात मंगेश भोयरचा मृत्यू झाला. त्याचे वडील आबाजी भोयर जखमी झालेत. एकंदरीतच नागपुरात पोलिसांचं राज्य आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा या घटना. मुख्यमंत्र्यांच्या गावात राज्याच्या उपराजधानीत असं हत्यासत्र सातत्याने होत असेल तर परिस्थिती कठीण आहे.