ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी, महिला कार्यकर्त्या आक्रमक

डोंबिवलीत शिंदे समर्थकांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, पत्र लिहून केल्या भावना व्यक्त

Updated: Jun 28, 2022, 09:23 PM IST
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी, महिला कार्यकर्त्या आक्रमक title=

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खबळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक संघर्ष टोकाला पोहोचलाय. राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही गटाचे समर्थक आमने-सामने आल्याचं चित्र पाहिला मिळतंय.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची उचलबांगडी करायला सुरुवात केली आहे. ठाण्यात शिवसेना जिल्हा संघटक पदावरून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. याविरोधात ठाण्यातील महिला शिवसेना पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यां संतप्त झाल्या आहेत. 

शिवसेनेतून आमची कोणी हकालपट्टी करु शकत नाही, आम्ही शिवसैनिकच आहोत, आमचं पद अशा प्रकारे कोणी काढून घेऊ शकत नाही आणि बातम्यांमधून दाखवलेलं लेटर अजुन तरी आमच्या पर्यंत पोहोचलेल नाही, तुम्ही अशा प्रकारे सर्वांचीच हकालपट्टी करणार असाल तर शिवसेना शाखेला टाळा लावायला तरी कोणाला ठेवणार आहात का? असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

तर आम्हाला कोणी पदावरुन कोणी काढू शकत नाही असं सांगत ठाण्यातील महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे यांनाच आव्हान केलं आहे. आम्ही आमच्या शिंदे साहेबांमुळे आहोत आणि पुढे हि राहु, सच्चा कार्यकर्तेची हकलापट्टी केल्याचं पत्र काढण्यापेक्षा त्या एका नासक्या आंबाला सेनेतून काढ़ा तर सर्व सेनाच खुश होईल अशा प्रतिक्रिया शिंदे समर्थक महिला कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. 

डोंबिवलीत शिंदे समर्थकांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र 
डोंबिवलीत शिंदे समर्थकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

काय म्हटलंय पत्रात?
शिवसेना पक्षात सक्रीय पदाधिकारी म्हणून आम्ही कार्यरत आहोत. पण गेल्या काही दिवसात ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, आमचे ठाण्याचे लाडके पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत असलेल्या अनैसर्गिक आघाडीमुळे शिवसेनेच्या भविष्यातील येणाऱ्या संकटाची चाहूल ओळखून आणि हिंदुह्रदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारासाठी, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे नेण्यासाठी जे पाऊल उचलले आहे त्या वाटचालीस आम्ही सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक संपूर्ण पणे पाठिंबा दिला आहे. 

तसंच त्या पाठींब्याचं अजून एक मुख्य कारण म्हणजे आमच्या शहरांचा विकास जो काही होत आहे किंवा यापुढे देखील होणार आहे तो निव्वळ आणि निव्वळ आमच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच होणार आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील त्या संपूर्ण निर्णयाच्या सोबत आम्ही आमची वाटचाल करणार असल्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक आमच्या शिवसेना पक्ष पदाचा राजीनामा देत आहोत.