नागपूर : काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचं निलंबन मागे घेण्यात आले आहे. नागपूर महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या मुलानं अलिकडेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतरही चतुर्वेदी यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. सतीश चतुर्वेदी यांना पक्षविरोधी कारवायांसाठी शहर काँग्रेसने बजावलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी दिलेली एक आठवड्याची मुदत संपली होती. तरीही त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली होती.
नागपुरात विलास मुत्तेमवार आणि सतीश चतुर्वेदी गट या दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. त्याचा मोठा फटकाही काँग्रेसला बसला. त्यातच पक्षविरोधी काम केल्याचा ठपका सतीश चतुर्वेदी यांच्यावर ठेवण्यात आला आहोत. तसेच भाजपविरोधात लढण्यासाठी तयारी करण्याऐवजी काँग्रेसमधील अंतर्गत वादमुळे पक्षाची पार वाताहत झाली.