माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे समोर आले आहे.  

Updated: Jul 16, 2020, 03:12 PM IST
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव  पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण title=

लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. त्यांना न्यूमोनिया झाला असून पुढील उपचारासाठी आज सकाळी पुण्यात हलविण्यात आले आहे.

निलंगेकर यांचे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे त्यांचे वास्तव्य असून घरीच असताना त्यांना कफ झाल्यामुळे लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना न्यूमोनिया असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांची कोव्हीड चाचणी करण्यात आली. ज्यात ते पॉझिटिव्ह आले. 

दरम्यान, त्यांच्या प्रकृती काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ही स्थिर असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितले.  काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले निलंगेकर हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आहेत. १९८५ मध्ये नऊ महिन्यांच्या अल्प काळासाठी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. २००२ मध्ये मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही ते महसूलमंत्री म्हणून काम पाहिले आहे.