सांगली : जिल्ह्यात पुराने हाहाकार उडाला आहे. पुराचा फटका हा कैद्यांनाही बसला. सांगली जिल्हा कारागृहात पुराचे पाणी शिरले आहे. कारागृहाबाहेर सात फूट पाणी आहे. तर कोठडीत पाच फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. यावेळी कारागृहात ३९० कैदी पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
दरम्यान, पुरातून त्यांना बाहेर काढण्यात येत होते. यावेळी एका कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अगोदर पुराच्या पाण्याने जिल्हा कारागृहाला वेढा घातला होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे आता कैद्यांच्या कोठडीतही पुराचे पाणी शिरले आहे.
दरम्यान, शिरोळजवळच्या अर्जूनवाड गावाला पूर्ण पाण्याचा वेढा पडलाय. चारशेहून अधिक लोक अडकून पडलेत. मदतकार्य पोहोचण्यात पुरामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांचंच घर पाण्याखाली गेले असून त्यांचं कुटुंब विस्थापित झाले आहे. शिरोळचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला अनेक कुटंबियांना घराबाहेर पडावं लागले आहे. आमदारांच्या घरामध्ये ६-७ फूट पाणी आहे. त्यांना त्यांच्या भावाच्या घराचा आसरा घ्यावा लागला आहे.