रत्नागिरी : हापूस आंबा कुणाचा? देवगडचा की रत्नागिरीचा? या वादाचं उत्तर आता मिळालंय... ना देवगडचा, ना रत्नागिरीचा... हापूस आंबा आहे अख्ख्या कोकणाचा... कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये पिकणा-या आंब्यालाच यापुढं हापूस असं नाव लावता येणाराय... हापूसचं पेटंट मिळावं यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतून अर्ज दाखल झाले होते. गेल्या 5 वर्षांपासून हे अर्ज प्रलंबित होते.
यासंदर्भात भारतीय पेटंट कार्यालयानं आज अंतिम निर्णय दिला. कोकणातील 5 जिल्हे वगळता देशात कुणीही हापूस हे नाव लावू शकणार नाही, असा निर्वाळा पेटंट कार्यालयानं दिलाय. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस अशा नावानंही पेटंट जारी झालंय... थोडक्यात कोकणाची हापूसवरची मालकी आता कायद्यानं सिद्ध झाली आहे.