कोल्हापूर : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सांगली जिल्ह्यातून विनापरवाना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव इथे आल्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काहीच दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी कोरोनाच्या उपचाराबाबत धक्कादायक वक्तव्य केलं होतं. गोमूत्र आणि गायीचे तूप हे अति तीव्र जंतुनाशक आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कोरोना बाधित रुणांच्या वर गोमूत्र आणि गायींच्या तुपाचा उपयोग करावा, असं संभाजी भिडे म्हणाले होते. चीन हा देशच कोरोना आहे, त्याच्यावर पाच वर्षे बहिष्कार घालण्याची मागणी ही भिडेंनी केली होती.
इस्लामपुरात हज यात्रेसाठी सौदी अरेबियातून आलेल्या चौघांना कोरोना झाला होता. यानंतंर याच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. या कुटुंबाने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. इस्लामपुरातील या कोरोनाबाधितांवर कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करावा. त्या रुग्णांनी इतरांचे जीव बेफिकीरीने धोक्यात घातले, असं निवेदन संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं.