सांगली : सांगली जिल्ह्यातील मल्लेवाडीत एक धक्कादायक घटना घडलीय. द्राक्ष बागेत फवारणी करताना एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झालाय.
सांगली जिल्ह्यातील मल्लेवाडी इथं द्राक्ष बागेवर फवारणी करताना चक्कर येऊन कोसळलेल्या शेतकऱ्याचा उपचार सुरु होण्याआधीच मृत्यू झाला. आज शुक्रवारी दुपारी 2.00 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. दादासाहेब तात्यासाहेब चौगुले (वय 38) असं शेतकऱ्याचं नाव आहे.
दादासाहेब चौगुले यांची मल्लेवाडीतील आड ओढा परिसरात तीन एकर शेती आहे. पैंकी दीड एकरावर द्राक्षबाग आहे. त्यांनी 28 सप्टेंबर रोजी छाटणी घेतली होती. दादासाहेब हे आज दुपारी फवारणी करत होते. यावेळी त्यांना चक्कर आली. तत्काळ त्यांनी मिरजेतील वान्लेस दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दादासाहेब यांच्या पश्चात वडील, पत्नी, सहा वर्षांचा मुलगा आणि दोन मुली आहेत...
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. या घटनेमुळे, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिरजेच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. मात्र मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही.