Satara Crime News: साताऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदी बु. गावातील वृद्ध महिला व्दारकाबाई कुचेकर यांना फसवणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. एकनाथ रघुनाथ शिंदे असं या भोंदुबाबाचे नाव आहे.
एकनाथ रघुनाथ शिंदे हा बाबा म्हणून परिसरात वावरत असतो. त्याने व्दारकाबाईच्या घरावर आणि प्रॉपर्टीवर कब्जा करण्यासाठी तिच्या मुलाच्या नावावर कागदपत्रे तयार केली होती. वृद्ध महिला मयत झाल्यानंतर भोंदूबाबाने तिच्या नातेवाईकांना सांगितले की, तोच तिचा मुलगा सोमनाथ कुचेकर आहे. मात्र नातेवाईकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांत माहिती दिली. तेव्हा या भोंदूबाबाचा कट उघड झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, द्वारकाबाई कुचेकर यांचा मुलगा सोमनाथ हा 1997 मध्ये घरातून निघून गेला होता. त्यानंतर कित्येक वर्ष तो येण्याची वाट घरचे पाहत होते. साधारण नऊ-दहा वर्षांपूर्वी एकनाथ हा द्वारकाबाईच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याने तिची सगळी माहिती मिळवली. त्याला तिचा मुलगा घरातून निघून गेला असल्याचे समजले. त्यानंतर याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने त्याने तोच तिचा मुलगा असल्याचे भासवले.
द्वारकाबाई यांच्या नावावर तीन एकर जमीन असल्याचे त्याला समजले होते. त्याचा फायदा घेण्यासाठी त्याने हा कट रचला. द्वारकाबाई यांनाही तो वरचेवर भेटू लागला होता. मात्र 9 डिसेंबर 2023 मध्ये द्वारकाबाई यांचे निधन झाले. तर, नातेवाईकांनी 27 नोव्हेंबर 2024 साली त्यांचे वर्षश्राद्ध केले. तेव्हा एकनाथ याने मीच सोमनाथ असून द्वारकाबाई यांचे श्राद्ध घालणार असल्याचे सांगितले. तेव्हा नातेवाईकांना त्याच्या संशय आला. त्यांनी या बाबत पोलिस ठाण्यात कळवले.
पोलिसांनी या प्रकरणात तपास करून त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भोंदूबाबाच्या अंमलात आणलेल्या फसवणुकीला चांगलेच तोंड दिले असून या प्रकरणात अन्य वयोवृद्ध महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी इतर पीडितांना पोलिसांकडे येण्याचे आवाहन केले आहे