नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुणे पोलिसांनी एका भोंदू बाबाला अटक केली आहे. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं हा भोंदू बाबा सांगायचा. त्याने उपचाराच्या बहाण्याने महिलेसह तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर या बाबाने महिलेच्या चौदा वर्षाच्या मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डोळे उघडलेल्या या कुटुंबाने बाबाच्या विरोधात पोलिसांकडे धाव घेतली.
साताऱ्याचा हैदर अली शेख... हा सध्या पोलिसांचा पाहूणचार घेतोय. अनेकांना फसवणारा हा एक भोंदू बाबा... मात्र पोलीस स्टेशनमध्ये जाण्याआधी अनेकांसाठी हा पूजनीय बाबा होता. स्वतःकडे दैवी शक्ती आहे असं हा भोंदू सर्वांना सांगायचा... आजार बरे करतो, दैवी शक्तीने नोकरी धंद्यातल्या अडचणी दूर करतो असं सांगत हा सावज हेरायचा... पुण्यातलं असंच एक सुशिक्षित सुखवस्तू कुटुंब या भोंदूबाबाच्या आहारी गेलं. कुटुंबाच्या अडचणी दूर करण्याऐवजी या भोंदूने या कुटुंबातल्या महिलांचं लैंगिक शोषण केलं.
या कुटुंबातल्या महिलेचं आणि तिच्या सासूचं या बाबानं लैंगिक शोषण केलं. वर दोन कार, साताऱ्यात एक फ्लॅट, पुण्यात एक ऑफीसही लाटलं. हा प्रकार काही वर्ष सुरू होता. एवढ्यावर भागलं नाही म्हणून या बाबाची नजर या कुटुंबातल्या अल्पवयीन मुलीकडे वळली. त्यानंतर या कुटुंबाचे डोळे उघडले आणि त्यांनी पोलीस स्टेशनचा रस्ता धरला.
भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. पुण्यातल्या इतरही अनेक कुटुंबांचं याचप्रकारे या भोंदूबाबाने शोषण केलं असण्याची शक्यता आहे. तपासात हे निष्पन्न होईलच पण असुशिक्षित म्हणवणारे नागरिक अशा भोंदूबाबाच्या आहारी जातात, त्याच्याकडून स्वतःचं लैंगिक शोषण करवून घेतात हे जास्त गंभीर आहे.