माजी सैनिकाला मारहाण : खासदार उन्मेष पाटील यांच्या चौकशीचे आदेश

भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकाला केलेल्या मारहाण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.  

Updated: Sep 15, 2020, 03:02 PM IST
माजी सैनिकाला मारहाण : खासदार उन्मेष पाटील यांच्या चौकशीचे आदेश title=
संग्रहित छाया

मुंबई / जळगाव : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकाला केलेल्या मारहाण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. २०१६ साली भाजपचे तत्कालिन आमदार असलेल्या उन्मेष पाटील यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. मात्र त्याप्रकरणी तत्कालिन भाजप सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. याप्रकरणी निवदेन आल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

भाजपचे सरकार असल्याने साधा एफआयआर देखील दाखल झाला नाही. २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. याबाबत आलेल्या निवेदनांनुसार आता पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आलेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेने माजी नौदल सेना अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या कृत्यावर टीका केली तर भाजप सतत टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील माजी सैनिक सोनू महाजन यांच्या कुटुंबियांवर फडणवीस सरकार काळात चाळीसगावचे माजी आमदार तथा सध्याचे जळगाव भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या आदेशाने माजी सैनिक यांच्या कुटुंबियांवर हल्ला झाला होता; तेव्हा त्यावर कारवाई का केली नाही ? सोनू महाजन यांच्या कुटुंबियांना सरंक्षण मंत्री फोन कधी करणार, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

 २०१६ साली सोनू महाजन या माजी सैनिक यांच्या कुटुंबियांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे उन्मेष पाटील यांचा होता. त्यांच्या घरात घुसून नऊ जणांनी त्यांना मारहाण केली होती. तीन वर्ष झाले त्यावेळी पोलिसांनी तक्रार नोंदली नव्हती. उच्च न्यायालयात दाद मागितली तेव्हा २०१९मध्ये तक्रार नोंदण्यात आली. तरीही त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई अद्यापही करण्यात आली नाही, असा सवाल सचिन सावंत यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. 

मी बीएसएफमध्ये पूर्व सैनिक असून २०१६ मध्ये तत्कालीन आमदार आणि सध्याचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्यासह नऊ जणांनी माझ्यावर हल्ला चढवला होता. अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, असे माजी सैनिक सोनू महाजन यांनी म्हटले आहे.