विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : नंदाताईंनंतर अजून एका शेतकरी तरुणीची कहाणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या तरुणीने इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करूनही आपल्या गावी कोकणात जाऊन काळ्या आईची सेवा करण्याला प्राधान्य दिलं. रिना केसरकर नावाची ही तरुणी नव्या पिढीसाठी म्हणूनच आदर्शवत ठरतेय. तिच्या जिद्दीची ही कहाणी...
शेतीची कामे करताना दिसणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तळेरे गावातील रीना केसरकरनं नुकतीच इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलीय. खरं तर उच्चशिक्षित तरुण-तरुणी शेती करण्यास नाके मुरडतात. मात्र, रिना त्याला अपवाद आहे. इंजीनियरिंगपेक्षा ती शेतीत अधिक रमते. त्यामुळे पंचक्रोशीत लोकांना तिच्या या शेतीप्रेमाचं कौतूक वाटतंय.
रिनाची सकाळ शेतीच्या कामापासून सुरु होते ती सूर्यास्तापर्यंत ती शेतीची विविध कामे करते. या शेतीच्या कामात तिला बहिण वर्षा आणि आईची मदत होते. वडिलांच्या आजारपणामुळे रिनाला या काही वर्षांपूर्वी नांगर धरावा लागला आणि त्यानंतर तिची शेतीची आवड वाढत गेली.
रिनाची बहिण वर्षा हीदेखील उच्चशिक्षित असून ती एका कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम करते. कॉलेजमधून घरी आल्यानंतर वर्षाही शेती काम करते. शेती करणाऱ्या या आपल्या उच्चशिक्षित मुलींचा बबन केसरकरांना पिता म्हणून अभिमान आहे. दोघीही आपल्या भविष्याची स्वप्न बघताना नवरा मुलगा शेतकरी असेल पण कष्ट करण्याची त्याची तयारी असेल तर त्याच्याशी लग्न करायला काहीच हरकत नसल्याचं सांगतात.
शेती करण्यापेक्षी शहरात जाऊन नोकरी करण्याकडं तरुण पिढीचा कल असतो. मात्र रिना आणि वर्षा या दोन उच्च शिक्षीत बहिणींची शेती विषयीचं प्रेम तरुणी पिढीला प्रेरणा देणारं आहे.