श्रावणातला उपवास सोडण्याआधी मंदिरात गेला, फॅनला हात लावताच विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तरुणावर मृत्यू ओढावला आहे. या प्रकरणात एकच खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 25, 2023, 04:09 PM IST
श्रावणातला उपवास सोडण्याआधी मंदिरात गेला, फॅनला हात लावताच विजेच्या धक्क्याने  तरुणाचा जागीच मृत्यू  title=
Electric shock through fan claims life of man at mulund temple

Mumbai News Today: 30 वर्षांचा तरुण देवळात आला मात्र देवाच्या डोक्यावर माथा टेकण्याआधीच त्याच्यावर मृत्यू ओढावला आहे. मुलुंडमधील देवळात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृत्यूमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी ही घटना घडली असून निमीश भिंडे असं या तरुणाचे नाव आहे. 

निमीश भिंडे हे व्यवसायिक असून त्यांचे मोबाईलचे दुकान होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निमीश मुलुंड येथील एलबीएस मार्गावर असलेल्या बाल राजेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. श्रावणातील उपवास सोडायच्या आधी ते संध्याकाळी देवाच्या दर्शनासाठी आले होते. मात्र, पावसात भिजल्यामुळं ते थोडे ओले झाले होते. आणि मंदिरातील जमीनदेखील ओली होती. त्याचवेळी अंगावरील ओले कपडे सुकवण्याच्या हेतूने त्यांनी मंदिरातील टेबल फॅन स्वतःकडे सरकवण्याचा प्रयत्न केला. 

टेबल फॅन स्वतःकडे वळवत असतानाच त्याला जोरदार विजेचा झटका लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयाने त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

श्रावण महिना असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात तर काही जणांचे उपवासदेखील असतात. श्रावणात मंदिराच्या ट्रस्टकडून भजन आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळं मंदिरात जेष्ठ नागरिकांसह महिला आणि मुलांची गर्दी होती. त्याचवेळी बाहेर पाऊस असल्यामुळं मंदिराची लादी/जमिनीवर पाणी साचले होते. मंदिरात गर्दी असल्यामुळं भिंडे यांनी थोडी हवा लागेल या हेतून टेबल फॅन स्वतःकडे वळवला. पण त्याचवेळी मंदिरात साचलेल्या पाण्यामुळं त्याला पंख्याचा शॉक लागला त्यातच पंखादेखील त्यांच्या छातीवर आदळला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत. मंदिरात कुठे लिकेजचा इश्यू होता का किंवा अर्थिंगचा प्रोब्लेम आहे का हे शोधण्यात येईल. निमीषच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळं त्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मुक्तीधाम स्मशानभूमीत निमीष यांच्यावर अत्यंसंस्कार पार पाडले आहेत.