विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झालीय. निवडणुकीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची खास नियुक्ती होते. पण निवडणुकीचं काम चुकवण्यासाठी काही सरकारी कर्मचारी वेगवेगळ्या सबबी सांगतायत. या गंमतशीर सबबींच्या अर्जांचा सध्या निवडणूक अधिकाऱ्यांकडं महापूर आलाय.
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं कर्मचाऱ्यांची जमवाजमव सुरु केलीय. आधीच कामाच्या बाबतीत उल्हास त्यात फाल्गुन मास अशी कर्मचाऱ्यांची अवस्था... निवडणुकीचं काम टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची बहाणेबाजी सुरू झालीय. 'रक्तदाब आहे जोखमीचं काम जमणार नाही, मणक्यात अंतर वाढलंय सलग बसणं शक्य नाही, हिमोग्लोबीन कमी झालंय, अशक्तपणा आलाय, गुडखे खूप दुखतात, घरी मुलांना सांभाळायला कोणी नाही' अशा सबबी सुरु झाल्यात.
एकट्या औरंगाबादमध्ये असे सातशे अर्ज आल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अजूनही अर्ज येणं सुरुच आहे. खूपच निकड असल्याशिवाय कुणाचाही सबब चालणार नाही असं निवडणूक आयोगानं ठणकावून सांगितलंय.
काम टाळायला ज्या प्रकारे आयडियाची कल्पना कर्मचारी राबवत आहेत. तितकी कल्पकता कामात दाखवली तर प्रशासन गतिमान होईल यात शंका नाही.