Eknath Shinde Group On Rashmi Thackeray Banner: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यावरुन कुरघोडी सुरु आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव महाविकास आघाडीचा चेहरा असेल अशापद्धतीची सूचक विधानं प्रवक्ते संजय राऊत यांनी अनेकदा केलं आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी यावर सावध भूमिका घेतली आहे. दुसरीकडे महायुतीमध्येही तिन्ही प्रमुख नेते ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे.
असं असतानाच आता राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार का? यावरुन चर्चा सुरु झाली आहे. त्यातच आज उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' या त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स झळकलेत. या बॅनर्सवर रश्मी ठाकरेंचा थेट 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख आहे. ‘पुढचा मुख्यमंत्री, आपल्या परिवाराचाच, त्याचे प्रतिबिंब तुमच्यात ही दिसते’, असा उल्लेख बॅनर्सवर दिसून येत आहे. रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटोही या बॅनर्सवर आहेत. दरम्यान या साऱ्या राजकीय घडामोडीदरम्यान मुख्यमंत्रिपदावरुन बोलताना शिंदेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदी ठाकरे गटाच्या व्यक्तीला पुढे करणं हा ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा राजकीय दृष्ट्या संपवण्याचा कट असल्याचा दावा केला आहे.
'झी 24 तास'शी बोलताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी रश्मी ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर प्रतिक्रिया नोंदवताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ठाकरे कुटुंबाला संपवायचं असल्याचं म्हटलं आहे. रश्मी ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत, असं म्हणत संजय शिरसाठ यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, "हा उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा डाव आहे. त्यांना ते (पद) मिळू देणार नाहीत. मात्र अपमानित जरुर करतील. त्यांना अपमान करायचा," असं म्हटलं. पुढे बोलताना शिरसाठ यांनी, "एवढं जर आहे आणि ते असं बोलतात तर त्यांचं नाव महाविकास आघाडीकडून का पुढे करत नाही? त्यांचा चेहरा का पुढे घेत नाहीत? हे त्यांना नामोहरण करुन त्यांना कसं संपवायचं याची रणनिती काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आखलेली आहे. ती आजही त्यांच्या लक्षात येत नाही," असं संजय शिरसाठ म्हणाले.
नक्की वाचा >> LIC कर्मचारी ते ठाकरेंची सून.. उद्धव यांचा वांद्रे ते डोंबिवली प्रवास.. रश्मी ठाकरेंची हटके Love Story
उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाबद्दल बोलताना संजय शिरसाठ यांनी, "यांना (ठाकरे कुटुंबातील कोणत्याही सदस्याला) मुख्यमंत्रिपद तर नाही पण भविष्यात महाविकास आघाडी राहील की नाही या स्तरावर आलं आहे. ही मिली भगत आहे. फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे गटाला नेस्तनाबूत करण्यासाठी हे षडयंत्र आहे. त्या पद्धतीनेच त्यांची वाटचाल सुरु आहे," असा दावा संजय शिरसाठ यांनी केला आहे.