Eknath Shinde MLA Bharat Gogawale: राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून सातत्याने चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि अजित पवार गटाकडून मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अदिती तटकरेंपैकी कोणाला ही जबाबदारी दिली जाणार याबद्दलचा संभ्रम अजूनही कायम असतानाच आता भरत गोगावलेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केलेलं विधान चर्चाचा विषय ठरत आहे. एकनाथ शिंदे आमच्या जिवावर मुख्यमंत्री झाले आहेत असं भरत गोगावलेंनी एका जाहीर सभेत म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यापद्धतीने मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे आमच्या जिवावर मुख्यमंत्री झाले आहेत, असं गोगावलेंनी म्हटलं आहे. "आमच्यासारखे शिलेदार मागे उभे राहिले म्हणून ते (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री होऊ शकले. छत्रपती
शिवाजी महाराजांच्या काळात जे मूठभर मावळे होते त्यांनी जीवाला जीव देवून स्वराज्य स्थापन केले. एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं नाही. तसेच एकनाथ शिंदे एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झाले नाहीत. आमच्यासारखे 40 आणि इतर 6 शिलेदार ताठ मानेने आम्ही त्यांच्यामागे उभे राहिलो म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासारखा चांगला माणूस मुख्यमंत्री होऊ शकला," असं गोगावले म्हणाले.
अलिबागमधील खानावचे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळींनी बुधवारी आमदार गोगावले, आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. याच कार्यक्रमात जाहीर भाषणात गोगावलेंनी मंत्रीपद न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली. एका आमदाराने पत्नी आत्महत्या करेल सांगितलं, दुसऱ्याने राजीनाम्याची धमकी दिली तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील असं म्हणत 3 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रीपदासाठी गळ घातली. म्हणून पेचात पडलेल्या मुख्यमंत्र्यांना या आमदारांना मंत्रीपद द्यावं असं सागून आपण मंत्रीपदापासून दूर राहिलो असं गोगावले म्हणाले. गोगावलेंनी उपस्थितांना मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली. गोगावलेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जनतेचे सेवा करण्याबरोबरच रात्री-अपरात्रीही कोणाला मदत लागल्यास धावून जा असा सल्ला दिला आहे.
रायगडमधून अनेक दिग्गज आमच्यासोबत येत आहेत. अलिबागमधील 62 ग्रामपंचायतींच्या विकासकामांसाठी 150 कोटींचा निधी आम्ही दिला आहे. आधीच्या आमदारांनी विकासकामं केली नाहीत. त्यामुळेच शेतकरी कामगार पक्ष संपत चालला आहे. आम्ही जनतेची सेवा करतोय म्हणून ते आमच्या पाठीशी आहेत, असंही गोगावलेंनी म्हटलं.