'शरद पवार संचालक नव्हते तर ते या घोटाळ्यात कसे?'

शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ प्रकाश आंबेडकर उतरले आहेत. 

Updated: Sep 25, 2019, 10:59 PM IST
'शरद पवार संचालक नव्हते तर ते या घोटाळ्यात कसे?' title=
संग्रहित छाया

लातूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आता वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे सुद्धा उतरले आहेत. शरद पवार हे शिखर बँकेचे कधीही संचालक नव्हते तर ते या घोटाळ्यात कसे, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी यावेळी उपस्थित केला. जर या प्रकरणात शरद पवार यांना अटक होणार असेल तर या घोटाळ्यात नेमका शरद पवार यांचा काय रोल होता हे जनतेला सांगावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.

पवारांची भूमिका काय आहे हे, जनतेपासून लपवून न ठेवता ईडीने याचा खुलासा करावा, असे आवाहनही आंबेडकर यांनी यावेळी केले. जर ईडीने हे केले नाही तर ईडीचा राजकीय वापर होत असल्याचे उघड होईल, असे आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. ते लातूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर बोलत होते.  

दरम्यान, राज्य शिखर बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात 'ईडी'ने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जाणुनबुजून ही कारवाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. प्रकाश आंबडेकर यांच्या आधी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीदेखील शरद पवार यांची पाठराखण केली आहे. मी विरोधी पक्षनेता असल्यापासून विधानसभेत राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा केला आहे. सुरुवातीपासून या गैरव्यवहारात कुठेही शरद पवार यांचे नाव नव्हते, हे मी जबाबदारीने सांगू शकतो. त्यामुळे आता अचानक गैरव्यवहारात शरद पवारांचे नाव कसे पुढे आले, याबाबत खडसेंनी शंका व्यक्त केली.