Maharashtra Political News : कोल्हापूर येथील राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांच्याशी संबधीत बँकेवर ईडीने (ED Raid) धाड टाकल्याने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीने धाड टाकली आहे. 24 तासानंतरही जिल्हा बँकेत अद्यापही ईडीची चौकशी सुरूच आहे. सलग दुस-या दिवशीही ईडीचे अधिकारी जिल्हा बँकेत चौकशी करत आहेत. पाच अधिकाऱ्यांना ईडी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.
हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आहेत. बुधवारी 1 फ्रेबुवारी 2022 रोजी सकाळीच ईडीचे अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले. ईडीचे अधिकारी सलग दुसऱ्या दिवशीही जिल्हा बँकेतील कागदपत्राची तपासणी करत आहेत.
तपासादरम्यान बँकेच्या पाच जणांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेल्याचे समजते. आम्ही स्वतःहून ईडी ऑफिस मध्ये चौकशी साठी येतो. पण आत्ता कोणाला ताब्यात घेवू नका अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. यामुळे बँकेबाहरे मोठी गर्दी आणि तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे.
ईडीच्या अधिका-यांनी जिल्हा बँकेतील कागदपत्राची तपासणी केली. इतकंच नाही तर हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे या साखर कारखान्यात देखील ईडीचे अधिकारी पोहोचले. काही दिवसांपूर्वीच हसन मुश्रीफ यांच्या घरावर, त्यांचे निकटवर्ती असणारे सहकारी आणि जावई यांच्या घरावर ईडीने धाड टाकली होती, त्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीने धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली.
यापूर्वी 12 जानेवारी 2023 रोजी हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या घरी ईडीचे (Hasan Mushrif Kagal Home ED Raid) अधिकारी दाखल झाले होते. तब्बल 14 तास हसन मुश्रीम यांची चौकशी सुरु होती. हसन मुश्रीफ यांचे पुण्यातील पार्टनरल चंद्रकांत गायकवाड यांच्या ऑफिसवरही ईडीने धाड टाकली होती. ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ऑफिसवर ईडीने छापे टाकले होते. कोलकात्याच्या कंपन्यांमधून पैसे मुश्रीफांच्या कारखान्यात आणण्यात गायकवाड यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. घोटाळ्याचे आरोप करत सोमय्या यांनी मुश्रीफांच्या ईडी चौकशीची मागणी केली होती. मुश्रीफांच्या शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर कागलच्या सर सेनापती साखर कारखान्यातही घोटाळ्याचा आरोप करत सोमय्यांनी ईडीकडे कागदपत्र दिली होती. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याचा तिसरा आरोपही सोमय्यांनी केला होता. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा सोमय्यांचा आरोप होता. दरम्यान या कारखान्यांशी आपला काही संबंध नाही, असा दावा मुश्रीफ यांनी केला होता.