पुणे : ED Raid News : राज्यात पुन्हा ED आणि ITकडून कारवाई करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तियांच्या घरी ईडीचा छापा मारण्यात आला आहे. दौंड शुगरचे संचालक जगदीश कदम यांच्या पुण्यातल्या घरी झडती घेण्यात येत आहे. त्याचवेळी राज्यातील अग्रगण्य बुलडाणा अर्बन पतसंस्थेवर आयकर विभाग अधिकाऱ्यांनी धाड टाकून चौकशी सुरु केली आहे.
आयकर विभाग अधिकाऱ्यांच्या (Income Tax Department Raid) छाप्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी EDचा छापा मारण्यात आला आहे. Income Tax Raid : याआधी अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. कोल्हापूर, पुणे, बारामती, अहमदनगरमध्ये छापेसत्र सुरु होते. (Income Tax Raid) चौकशीत मोठे घबाड मिळाल्याचा दावा करण्यात आला. मात्र ही माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर छापेसत्र सुरु असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी केंद्र सरकारला जोरदार टोलाही लगावला.
राज्यातील अग्रगण्य समजली जाणारी बुलडाणा अर्बन पतसंस्थेवर आयकर विभाग अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरूच आहे. (Income Tax Raid on Buldana Urban Cooperative Credit Society ) कालपासून आयटीने कारवाई सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. आजही मोठ्या पोलीस बंदोबस्तात बुलढाणा अर्बनची झाडाझडती सुरु आहे.
पतसंस्थेतील मोठ्या व्यवहारांची तपासणी होत असल्याची माहिती आहे. यासोबतच बुलढाणा अर्बनच्या इतर आठ कंपन्यांची तपासणी होण्याची दाट शक्यता आहे. बुलडाणा अर्बन ही पतसंस्था बरीच मोठी असून जवळपास साडेचारशे शाखांचा कारभार चालतो. मुख्य शाखेत सुरु असलेल्या झाडाझडती मुळे सध्या सहकार क्षेत्राला हादरा बसला असून आता चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणे महत्त्वाचे आहे.