आरोग्य विभागाच्या अक्षम्य उदासीनतेमुळे रविताला कायमचं अपंगत्व

आरोग्य यंत्रणेच्या संवेदना शून्य प्रवृत्तीमुळे  नंदुरबारमधल्या रविताला कायमचं अपंगत्व आलंय

Updated: Oct 16, 2017, 09:42 PM IST
आरोग्य विभागाच्या अक्षम्य उदासीनतेमुळे रविताला कायमचं अपंगत्व title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : आरोग्य यंत्रणेच्या संवेदना शून्य प्रवृत्तीमुळे  नंदुरबारमधल्या रविताला कायमचं अपंगत्व आलंय. सध्या ती मृत्यूशी झुंज देतेय. काही सामाजिक कार्यकर्ते आणि धुळ्यातील डॉक्टरांच्या आर्थिक मदतीतून तिच्यावर सध्या मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये खोडक्या, रोषमाळ पाडा इथं राहणारी रविता वळवी. आरोग्य यंत्रणेच्या संवदेना शून्य प्रवृत्तीमुळे तिला कायमचं अपंगत्व आलंय. सरकारच्या आरोग्य विभागाच्या अक्षम्य उदासीनतेमुळे रविता फक्त अपंगच झालेली नाही तर ती या घडीला मरणाच्या दारात उभी आहे.

रविताला पडल्याबरोबरच धुळ्यात आणलं असतं तर ती पुन्हा तिच्या पायावर उभी राहू शकली असती. तिच्या बरगड्या आणि पाठीचा मणका कायमचा निकामी झाला आहे. कमरेखालच्या सर्व संवेदना संपल्या आहेत. ती आता फक्त श्वास सुरु असलेले आणि वेदनांनी तुडुंब भरलेले शरीर घेऊन जिवंत आहे. जिल्हा रुग्णालयाची अॅम्बुलन्स दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये असल्यामुळे रविताला वेळेवर अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होऊ शकली नाही.

डॉक्टरांचे प्रयत्नच आता रविताला वाचवू शकतात अन्यथा ती येत्या काही दिवसात या जगाचा निरोग घेईल, अशी तिची स्थिती आहे. त्यात दोष कुणाचा?, शिक्षा कोणाला आणि केव्हा होणार ?