डीएसके अटकेनंतर ठेवीदार, ग्राहकांचे पैसे परत कसे मिळणार?

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएस कुलकर्णी यांना अटक झाली. मात्र फसवणूक झालेले ठेवीदार असो वा फ्लॅट बुक केलेले ग्राहक यांना पैसे परत मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 20, 2018, 09:38 AM IST
डीएसके अटकेनंतर ठेवीदार, ग्राहकांचे पैसे परत कसे मिळणार?  title=

पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएस कुलकर्णी यांना अटक झाली. मात्र फसवणूक झालेले ठेवीदार असो वा फ्लॅट बुक केलेले ग्राहक यांना पैसे परत मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

तक्रारदारांना एकत्र करून पुढील लढाई

अशावेळी डीएसकेंना बेकायदा कर्ज देणाऱ्या बँकांना बेदखल करून ठेवीदार तसंच ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं म्हटलंय. सरकारने या नागरिकांची  जबाबदारी घेण्याची गरज असल्याचं मत विजय कुंभार यांनी म्हटलंय. त्यासाठी डीएसकेंकडून फसवणूक झालेल्या तक्रारदारांना एकत्र करून पुढील लढाई लढू असं कुंभार यांनी म्हटलंय. 

डीएसकेंची प्रकृती स्थिर

सध्या डीएसकेंची प्रकृती स्थिर आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके पोलिसांच्या अटकेत आहेत. शनिवारी न्यायालयाने डीएसकेंना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. कोठडी दरम्यानच डीएसकेंचा पोलीस कोठडीत तोल गेला आणि ते कोसळल्याची माहिती समोर आली.

डीएसकेंचं ब्रेन हॅमरेज झाल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांचं एमआरआय आणि सीटी स्कॅन करण्यात आलं. या दोन्ही चाचण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांची चार पथकं डीएसकेंना अटक करण्यासाठी दिल्लीला रवाना झाली होती. शनिवारी पहाटे ३ वाजता दिल्लीतून डीएसके यांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

फसवणुकीचा गुन्हा दाखल

डीएसकेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी योजनाबद्धरितीनं आर्थिक फसवणूक केलीय. त्यांच्या सात वेगवेगळ्या कंपन्या आहेत. जवळपास ११५३ कोटी ठेवी किंवा असुरक्षित कर्ज स्वरुपात स्वीकारले आहेत. त्यांनी हा पैसा कुठे वळवला? याचा तपास करायचा आहे. यात बँकांचाही पैसा आहे. याबाबतची कागदपत्रं आम्हाला मिळालेली नाहीत. बॅंकाचे व्यवहार तपासायचे आहेत... यात अनेक व्यक्ती सहभागी आहेत, त्याबाबतचा तपास करायचा आहे. डीएसकेंनी यापूर्वी त्यांनी तपासात सहकार्य केलेले नाही.

यातील सर्व माहिती तेच सांगू शकतात कारण ते या गुन्ह्याचे मास्टरमाइंड आहेत. हा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यापेक्षाही गंभीर आहे. कारण खुनात एकाचा मृत्यू होतो, इथे असंख्य लोक जिवंतपणी मरणयातना भोगत आहेत. त्याला जबाबदार फक्त डीएसके आहेत. त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी हवी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता.