व्हिडीओ जर्नलिस्ट अनिल सौंदड़े सह दिनेश दुखंडे झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या एका गावात सध्या फॉर्च्युनर गाडी ही गावची ओळख बनलीय. ही सगळी समृद्धी महामार्गाची कमाल मानली जातीये. फॉर्च्युनरच्या सोबतीला गावात लाखालाखांच्या नव्या गाडयांनीही धुमाकूळ घातलाय...
समृद्धी महामार्गामुळे एका गावाची जीवनशैली इतकी बदलून गेलीय की इथं लोकांनी गाड्या विकत घेण्याचा अक्षरश: सपाटा लावलाय. फॉर्च्युनर, इनोव्हा, बलेरो इतकंच काय एक सो एक कम्पनीच्या फटफाट्या गावातल्या रस्त्यांवर धावू लागल्याहेत. हातात पैसे असल्यानं ही चैन लोकांना सध्या परवडतेय.
अहमदनगरमधलं हे धोत्रे गाव...गावात रहदारीसाठी पक्क्या रस्त्याचे वांदे आहेत...पण समृद्धी महामार्गामुळे आलेल्या समृद्धीनं गावात सध्या बड्या गाड्यांनी धुमाकूळ घातलाय...या कच्च्या, ओबडधोबड रस्त्यांवर धावणाऱ्या पोलीस पाटलांच्या नव्या कोऱ्या करकरीत गाडीनं तर गावात सध्या हवाच केलीये ना राव ! पोलीस पाटील देवेश भाऊसाहेब माळवदे यांची सव्वा चार एकर जमीन समृद्धी महामार्गात गेलीये..त्याचे त्यांना अंदाजे दोन कोटी रुपये मिळालेत...आणि मग काय, पाटलांनी लगेच दारात नवं कोरं फॉर्च्युनरचं टॉप मॉडेल उभं करून धुराळाचं उडवला ना राव !.. काल-परवाच त्यांनी गाडीने कुटुंबासह शिर्डीत जाऊन साईंचं दर्शनही घेतलं...
गावात पोलीस पाटलांची फॉर्च्युनर आली आणि पाठोपाठ इनोव्हा, बोलेरो आणि फटफाट्याही आल्यात... धोत्रे गावातून श्रीरामपूरमधल्या एका बाईक शोरूममध्ये सध्या एक, दोन नव्हे तर चक्क ११४ बुलेट मोटार बाईक खरेदीसाठी बूक झाल्याहेत... त्यामुळे गावात फटफफटयांचा धुरळा उडणार आहे... गावातले आणखी एक समृध्दीबाधित शेतकरी बाबासाहेब चव्हाणांच्या दारातही इनोव्हा कार उभी राहिलीय आणि कॉलेजात शिकणाऱ्या मुलानं नवी कोरी मोटार बाईक घेतलीय...
गावात सध्या फक्त आणि फक्त समृद्धी महामार्ग आणि देवेंद्र फडणवीस सरकारचे गोडवे गायले जाताहेत. धोत्रे गावावर सध्या समृद्धीची कृपा झालीय. त्यामुळे गाव तसं चांगलं आणि समृद्धीचं वरदानही लाभलं. हीच चर्चा गावच्या नाक्यानाक्यावर आहे.