डोंबिवलीकर पित्याची कमाल! 5 वर्षाच्या लेकीसह रचला एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचा विक्रम

अवघ्या नऊ दिवसांत या बाप-लेकीनं एव्हरेस्टची चढाई करत 17 हजार 598 फूटावरील बेस कॅम्प गाठला. प्रिशा दोन वर्षांची असल्यापासूनच ट्रेकिंग करतेय. 

Updated: Jun 20, 2023, 10:43 PM IST
डोंबिवलीकर पित्याची कमाल! 5 वर्षाच्या लेकीसह रचला एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचा विक्रम  title=

अतीश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : एका पित्याने पाच वर्षाच्या लेकीसह रचला एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचा विक्रम रचला आहे. डोंबिवलीकर पित्याने ही कमाल केली आहे.  प्रिशा निकाजू या डोंबिवलीतील अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं, वडील लोकेश निकाजू यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला आहे. 

प्रत्येकाला आयुष्यात एका उंचीवर जाण्याची इच्छा असते. कधी कोणाला श्रीमंतीने उंची गाठायची असते , कधी कोणाला विचाराने तर कधी कोणाला उच्च पदी विराजमान होऊन उंची गाठावी अशी आशा असते. मात्र डोंबिवलीतील एका 5 वर्षाच्या चिमुरडीने तिच्या वडिलां समवेत जगातील उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर जाऊन अनोखी उंची गाठली आहे. डोंबिवलीतील 5 वर्षीय प्रिशा निकाजू आणि लोकेश निकाजु या बाप लेकीने एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत जाण्याचे ठरवले आणि नऊ दिवासात ती 17 हजार 598 फूट उंचीवर ती पोहचली.

कशी केली तयारी?

एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाण्याआधी डोंबिवलीतील पलावा मध्ये राहणारी प्रिशा रोज 5 ते 6 मैल चालत असते. तिला कराटे, टेबल टेनिस , पोहणे आवडते त्यामुळे ती सतत या सर्व खेळांचा सराव करत असते असे तिची आई सीमा निकजू सांगतात. प्रिशा दोन वर्षांची असल्यापासून ट्रेकिंग करते. इतकेच नव्हे तर तिने सिंहगड, लोहगड, विसापूर, कर्नाळा, सोंडाई, कोथळी गड, प्रबळमाची , कलावंतीण , रायगड, असे गड सर केले आहेत. तिने वयाच्या तिसऱ्या वर्षी कळसूबाई शिखर सर केले आहे. विशेष म्हणजे एव्हरेस्ट बेस सर करताना तिला कोणताही त्रास झाला नाही असे तिचे वडील सांगतात

अशी निर्माण झाली ट्रेकिंगची आवड

प्रिशाचे वडील लोकेश नीकाजू यांना ट्रेकिंगची आवड आहे. दर शनिवारी रविवार ते प्रिशाला घेऊन ट्रेकिंगला जात असल्याचे ते सांगतात. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियारींग अँड अलाईड स्पोर्ट्स या संस्थेचे ते माजी प्रशिक्षणार्थी आहेत.हिमालय, धौलागिरी,अन्नपूर्णा आणि देश, वेदेशचे आणखी शिखरे सर करण्याचे प्रिशाचे स्वप्न आहे. तिच्या इच्छा यादीत माउंट एव्हरेस्ट देखील आहे.भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने तिला पाठिंबा आणि मान्यता द्यावी अशी अपेक्षा तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. प्रिशाला स्वतः वडीलच मार्गदर्शन करतात.