Video: राज ठाकरेंच्या राजीनाम्याचं पत्र कुणी लिहिलं? संजय राऊतांनी रुतलेला काटा अखेर काढला, म्हणाले...

Sanjay Raut in khupte tithe gupte: राज ठाकरे यांच्या राजीनाम्याचं पत्र संजय राऊतांनी लिहिलं, अशी चर्चा आजही राजकीय विश्वात होताना दिसते. संतापलेल्या शिवसैनिकांनी त्यावेळी संजय राऊतांची गाडी देखील फोडली होती. 

Updated: Jun 20, 2023, 10:38 PM IST
Video: राज ठाकरेंच्या राजीनाम्याचं पत्र कुणी लिहिलं? संजय राऊतांनी रुतलेला काटा अखेर काढला, म्हणाले... title=
Sanjay Raut on Raj Thackeray

Sanjay Raut on Raj Thackeray Resignation letter: 27 नोव्हेंबर 2005 ही तारीख आजही अनेकांच्या लक्षात असेल. महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनापासून नाराज असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी वेगळी वाट निवडली. शिवसेनेतून पहिल्यांदा एक 'ठाकरे' बाहेर पडले होते. राज ठाकरे यांनी भावूक भाषण दिलं आणि शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला. राज ठाकरे यांच्या राजीनाम्याचं पत्र संजय राऊतांनी (Sanjay Raut) लिहिलं, अशी चर्चा आजही राजकीय विश्वात होताना दिसते. संतापलेल्या शिवसैनिकांनी त्यावेळी संजय राऊतांची गाडी देखील फोडली होती. अशातच राज ठाकरेंच्या राजीनाम्याचं पत्र कुणी लिहिलं? यावर संजय राऊतांनी भाष्य केलंय.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो ‘खुपते तिथे गुप्ते’ याचा (khupte tithe gupte)  तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. नुकताच संजय राऊतांचा कार्यक्रमातील एक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. यामध्ये संजय राऊत आपल्या मुलुखमैदानी शैलीत उत्तरं देताना दिसले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) यांनी राऊतांना बोचणारा प्रश्न विचारला. त्यावर राऊतांनी उत्तर दिलंय.

राज ठाकरे यांच्या राजीनाम्याचं पत्र तुम्हीच लिहिलं होतं, असा तुमच्यावर आरोप आहे, असा सवाल अवधूत गुप्ते यांनी केला. त्यावर संजय राऊत यांनी तिरकस उत्तर दिलं.

काय म्हणाले संजय राऊत?

राज ठाकरे आणि माझी मैत्री ही जगजाहीर होती. त्या काळात आम्ही चांगले मित्र होतो. आम्ही एकमेकांकडे अनेक भावना व्यक्त देखील करायचो. त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललंय? याची मला कल्पना होती. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. पण ही कुटुंबात पडलेली फूट आहे. 

मी पक्षाचा किंवा उद्धव ठाकरेंचा मालक नाही. मी राज ठाकरे यांच्या फार जवळचा होतो, असा आरोप केला जात होता. मी अनेकांच्या जवळ आहे. त्यांच्याबरोबरची नाती मी टिकवून ठेवलीयेत हे अनेकांना खुपतं, असं म्हणत त्यांनी वर्षानुवर्ष रुतलेला काटा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहा Video

दरम्यान, या कार्यक्रमात त्यांनी नारायण राणे यांच्यावर तोंडसुख घेतलं. बाळासाहेबांनी संजय राऊत यांना खासदार करायचं असं मला सांगितलं होतं, असं नाराणय राणे म्हणाले होते. त्यावेळी राऊतांकडं मतदान कार्ड नव्हतं, असंही नारायण राणे यांनी म्हटलं होतं. राणेंनी केलेल्या टीकेवर राऊतांनी पलटवार केला. हे महाशय खोटं बोलतायत. माझा मतदार नोंदणी क्रमांक मी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर त्यांची खासदारकीही जाऊ शकते, असं संजय राऊत म्हणाले आहेत.