तिच्या हत्येचं पाप 'सोफ्यात' लपवणं 'सोपं' वाटलं, पण त्याच्या चपलेनं 'पाप'समोर आणलं

डोंबिवलीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती, पण पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपीला अटक केली   

Updated: Feb 18, 2022, 03:35 PM IST
तिच्या हत्येचं पाप 'सोफ्यात' लपवणं 'सोपं' वाटलं, पण त्याच्या चपलेनं 'पाप'समोर आणलं title=

आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : महिलेची निर्घृण हत्या करत मृतदेह घरातील सोफ्यात लपवल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील डोंबविलीत उघडकीस आली होती.  सुप्रिया शिंदे असं या मृत महिलेचं नाव असून ती पती आणि मुलासोबत डोंबिवलीतल्या दावडी भागात राहत होती.

नेमकी घटना काय
डोंबिवली पूर्वेतल्या दावडी इथल्या शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सी इमारतीत राहणारे किशोर शिंदे नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेले. यावेळी घरात त्यांची पत्नी सुप्रिया आणि मुलगा होता. तब्येत बरी नसल्याने सुप्रियाने शेजारी राहणाऱ्या महिलेला मुलाला शाळेत सोडण्यासाठी सांगितलं. दुपारी साडे बारा वाजता मुलगा शाळेत गेला. त्यानंतर सुप्रिया एकटीत घरी होती.

संध्याकाळी किशोर कामावरुन घरी परतले, तेव्हा त्यांना घरात सुप्रिया दिसली नाही. म्हणून त्यांनीआजूबाजूला शोध घेतला, नातेवाईकांना फोन करुन विचारलं, पण तिचा कुठेच शोध लागत नव्हता. अखेर रात्रीच्या सुमारास सुप्रिया हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी किशोर मानपाडा पोलीस ठाण्यात गेले. या दरम्यान शेजाऱ्यांना किशोर यांच्या घरातील सोफा अस्ताव्यस्त आढळला. त्यांना संशय आल्याने त्यांनी सोफा उघडला असता त्यांना जबर धक्का बसला.

सोफ्यात सुप्रियाचा मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत आढळून आला, सुप्रियाची हत्या गळा दाबून करण्यात आली होती.

असा लागला छडा
सुप्रिया हिची गळा आवळून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास सुरु केला. मात्र काहीच सुगावा नसल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पोलिसांनी काही साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यात सुप्रिया हिच्या घराबाहेर चप्पल असल्याची माहिती त्यांना मिळाली.

या एका पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला. धक्कादायक म्हणजे सुप्रियाची हत्या करणारा आरोपी हा त्यांचाच शेजारी आहे. विशाल घावट असं या आरोपीचं नाव असून पुस्तक देण्याच्या बहाण्याने तो घरात शिरला. त्याने सुप्रियावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण सुप्रिया प्रतिकार केल्याने विशालनेही तिची गळा दाबून हत्या केली. यानंतर त्यानंतर त्याने सुप्रिया मृतदेह सोफ्यात लपवला आणि तिथून तो निघून गेला.

धक्कादायक म्हणेज सुप्रियाचे पती किशोर यांच्याबरोबर मिसिंगची तक्रार दाखल करण्यासाठी विशाल त्यांच्याबरोबर पोलीस स्थानकातही गेला होता. पण एक चप्पलने त्याचा डाव फसला आणि चोवीस तापास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.