राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडून युटर्न घेतात का? मनसे अध्यक्ष म्हणाले, जे पाकिटमार....

 राज ठाकरे यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांच्यावर आदोलनांवरून होणाऱ्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे

Updated: Jul 23, 2022, 09:08 PM IST
राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडून युटर्न घेतात का? मनसे अध्यक्ष म्हणाले, जे पाकिटमार.... title=

Raj Thackeray Exclusive Interview : राज्याच गेले काही दिवस मशिदीवरील भोग्यांवरुन वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी इशारा देत मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यास सांगितले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवण्यास सुरुवात केली होती. यानंतर काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आली. यानंतरही शेवटपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली होती.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांच्यावर आदोलनांवरून होणाऱ्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरे आंदोलन हातात घेतल्यानंतर ते अर्धवट सोडून युटर्न घेतात असा प्रश्न या वेळी विचारण्यात आला. त्याबाबत बोलताना राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

"याचं कारण माझ्या विरोधकांचा प्रचार आहे. मला एक गोष्ट दाखवा की जी गोष्ट मी अर्धवट सोडली आहे. मुळात पहिल्यांदा आम्ही आंदोलनं केली . जे पाकिटमार  स्तंभलेखन करून माझ्यावर टीका करतायत की राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतात. या सगळ्यात ते राजकीय पक्ष काय करत होते?"  असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

"आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून शिवसेना-भाजपच्या जाहिरनाम्यात होतं ना. मग ज्यावेळेला राज ठाकरेनं टोल संदर्भांत आंदोलन केलं आणि महाराष्ट्रात 67 टोलनाके बंद केले त्याचं श्रेय तुम्ही देणार नाही. सत्तेत आल्यावर मुंबई आणि इतर ठिकाणी सुरु असलेले टोल बंद करण्याचं काम त्यांचं होतं. त्यावर ते उत्तरं देणार नाहीत. ते आंदोलनं करणार नाहीत," असे राज ठाकरे म्हणाले. 

"माझं एक आंदोलन दाखवा मला जे अर्धवट सोडून दिलं मी. भोंग्याचं आंदोलनच घ्या, जवळपास 92 टक्के भोंगे बंद झाले. आजपर्यंत फक्त भोंगे काढा काढा एवढंच सांगत होते. बाकीचे सगळेही कमी झाले. त्यामुळे प्रश्न असा आहे की हे लोक काही करणार नाहीत पण जो करतोय त्याला बदनाम कसे करायचे यासाठी प्रयत्न करतात" असेही राज ठाकरे म्हणाले.