भाजपमध्ये जावू नका - राजू शेट्टींची उदयनराजेंना विनंती

उदयनराजे भोसले यांच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष... 

Updated: Sep 4, 2019, 08:11 PM IST
भाजपमध्ये जावू नका - राजू शेट्टींची उदयनराजेंना विनंती  title=

सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राजेंची मनधरणी केली आहे. मात्र हे सगळं निष्फळ ठरल्याचं समोर आलं आहे. सातार शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी उदयनराजेंसोबत अर्धा तास चर्चा केली. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ नका अशी विनंती उदयनराजेंना राजू शेट्टी यांनी केली आहे. अजूनतरी असा कोणताच निर्णय घेतला नसल्याचं राजू शेट्टी यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केलं आहे.

याआधी भाजपमध्ये जाण्याचे वेध लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मनधरणी करण्यात खासदार अमोल कोल्हे यांना अपयश आले होते. अमोल कोल्हे यांनी सोमवारी सातारा विश्रामगृहावर उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीनंतर अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांनी एकत्रितपणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली. 

'ही भेट मैत्रीपूर्ण होती. मी साताऱ्याला आल्यावर नेहमीच महाराजांना भेटतो. महाराजांसारखी व्यक्तिमत्व स्वयंभू असतात. त्यामुळे आपण काय निर्णय घ्यायचा, हे त्यांना चांगल्याप्रकारे कळते,' असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले. त्यामुळे उदयनराजे यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे समजले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उदयनराजे भोसले यांनी याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली आहे. याआधी उदयनराजेंचे बंधू आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्यामुळे उदयनराजे अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे.

शिवेंद्रराजे भोसले हे सत्तेसोबत गेले आहेत. सत्तेसोबत असल्यामुळे शिवेंद्रराजे हे सातऱ्यात आणखी मजबूत आणि सक्षम होतील, याची भीती आहे, त्यामुळे उदयनराजे भोसले हे पक्ष बदलण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तर राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडेल, त्यामुळे भाजप ही संधी सोडण्याची शक्यता कमी आहे. उदयनराजे भोसले हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही उदयनराजेंनी त्यांचं स्वत:चं वेगळं अस्तित्व ठेवलं आहे. तसंच आपण पक्ष मानत नसल्याचंही त्यांनी अनेकवेळा सांगितलं. त्यामुळे आता उदयनराजे भोसले काय निर्णय घेतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.