Dhairyasheel Mane No entry in Belagav : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्यातील वातावरण तापलेलं आहे. मोठ्या घमासानानंतर दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री सीमावादाचा वादाचा प्रश्न घेऊन गृहमंत्री अमित शहांकडे गेले होते. त्यावेळी पार पडलेल्या बैठकीनंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोणत्याही राज्याने दावा करायचा नाही, असं अमित शहा यांनी सांगितलं होतं. आता प्रकरण कुठे शांत झालं असं वाटत असताना खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटकमध्ये जाणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र माने यांना बेळगाव जिल्हाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
बेळगावमधील टिळकवाडी इथल्या व्हॅक्सिन डेपोवर आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला उपस्थित राहणार अशी भूमिका खासदार धैर्यशील माने यांनी घेतली होती. मात्र बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर जिल्हाबंदीचे आदेश दिले आहेत. भाषिक तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून बेळगाव बंदी घातल्याच जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशात उल्लेख करण्यात आला आहे.
बेळगाव मध्ये कर्नाटक राज्याचा अधिवेशन होत असल्याने भाषिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो म्हणून बंदीचा आदेश घालण्यात आला आहे. या वादाचे पडसाद राज्यभर उमटले होते. महाराष्ट्रातील गाड्या अडवत कन्नड रक्षक वेदिकेच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काचा फोडल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्रातही कर्नाटकच्या एसटी गाड्या अडवत नंबर प्लेटला काळं फासण्यात आलं होतं. आता माने बेळगावमध्ये जाणार की नाहीत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.