आमच्या उणीवा दाखवा, पण पूराचे राजकारण करु नका- देवेंद्र फडणवीस

सांगलीत नऊ दिवसांमध्ये ७५८ टक्के पाऊस पडला. 

Updated: Aug 10, 2019, 04:16 PM IST
आमच्या उणीवा दाखवा, पण पूराचे राजकारण करु नका- देवेंद्र फडणवीस title=

सांगली: सरकारच्या कारभारातील त्रुटी दाखवून देणे हे विरोधकांचे काम आहे. त्यांनी त्या दाखवून द्याव्यात, आम्ही कारभारात जरुर सुधारणा करू. मात्र, पूरपरिस्थितीचे राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते शनिवारी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपरिस्थितीचा सविस्तर तपशील सादर केला. यंदा कोल्हापूर आणि सांगलीत प्रचंड पाऊस झाला. २००५ मध्ये कोल्हापूरमध्ये ३१ दिवसांत १५९ टक्के पाऊस पडला होता. मात्र, यंदा अवघ्या नऊ दिवसांत ४८० टक्के पाऊस झाला. तर सांगलीमध्येही २००५ मध्ये ३१ दिवसांत २१७ टक्के पाऊस झाला होता. मात्र, यंदा अवघ्या नऊ दिवसांमध्ये ७५८ टक्के पाऊस पडला. यामुळे कोयना आणि इतर धरणांतून पाण्याचा मोठ्याप्रमाणावर विसर्ग झाला. परिणामी अभूतपूर्व अशी पूरस्थिती निर्माण झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

राज्य सरकार कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरपरिस्थितीवर पहिल्या दिवसापासून लक्ष ठेवून होते. पहिल्या दोन ते तीन दिवसांत पाण्याची पातळी जास्त नव्हती. मात्र, त्यानंतर पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. यानंतर सरकारने पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. 

याशिवाय, पुरात मृत पावलेल्या लोकांना आणि जखमींना पूर्वीपेक्षा अधिक मदत देण्यात येणार आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले असल्यास त्यासाठीही योग्य भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे

* सांगलीत ९३ बोटी बचावकार्यात सहभागी
* १०१ गावांमधून २८५३७ कुटुंबे विस्थापित, १,४३,००० लोकांचा समावेश, ११७ छावण्यांमध्ये व्यवस्था
* छावण्यांमध्ये ३५ हजार जनावरे 
* पुराच्या पाण्यात कोल्हापूर आणि सांगलीतील २७,४६७ शेतजमिनीचे नुकसान
* ४८४ किलोमीटरचे रस्ते पाण्याखाळी गेल्याने नुकसान 
* २६१५ रोहित्रे (जनरेटर्स) खराब, पूर ओसरल्यानंतर युद्धपातळीवर पूर्ववत करणार
* पूरग्रस्तांना मदतीची रक्कम बँकेत आणि रोख स्वरुपात देणार
* पुरात दगावलेल्या लोकांना पाच लाख तर अपंगत्व आलेल्यांना दोन लाखांची भरपाई
* पुरात घर पडल्यास एक लाखाची भरपाई, डागडुजीसाठीही पैसे मिळणार
* पुरात मृत्यू झालेल्या दुभत्या जनावरांसाठी ३० हजार, लहान जनावरे तीन हजार आणि बैलासाठी २५ हजारांची भरपाई
* कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता करून मदतीची रक्कम देण्याचे बँकांना आदेश
* पुराचे पाणी ओसरल्यानंतर प्रत्येक गावात डॉक्टर आणि वैद्यकीय पथक तैनात करणार
* रोगराई टाळण्यासाठी पुराचे पाणी ओसरल्यानंतर आजुबाजूच्या महापालिकांची मदत घेऊन युद्धपातळीवर कामाला सुरुवात करण्याचे आदेश
* शेतीमधील गाळ काढण्यासाठी प्रतिहेक्टर १३ हजार रुपये, जमीन खरवडून गेली असल्यास प्रतिहेक्टर ३८ हजारांची नुकसान भरपाई