राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब

Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरु असताना अन्य राजकीय पक्षातून शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आवाहन करण्यात येत आहे. शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याची उत्सुकता आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: May 4, 2023, 10:18 AM IST
राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब title=

Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार? शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. निवृत्तीच्या निर्णयाबद्दल समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे पवार यांनी म्हटले आहे. तसे पवारांनी नेत्यांसमोर वक्तव्य केल्याची माहिती आहे. दरम्यान, 6 मेची बैठक 5 मे रोजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे उद्याच राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण हे स्पष्ट होणार आहे.

शरद पवार आपल्या निवृत्तीवर ठाम असल्यामुळे आता नव्या अध्यक्षाची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, राष्ट्रवादीची धुरा कुणाच्या खांद्यावर असेल याचे आडाखे बांधले जात आहेत. अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील अशी अनेक नावं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चर्चेत आली. मात्र या सर्व नावांमध्ये सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या अध्यक्षा किंवा कार्यकारी अध्यक्षा होऊ शकतात.

राहुल गांधी, एम के स्टॅलिन यांचा सुप्रिया यांना फोन

दरम्यान, राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरु असताना अन्य राजकीय पक्षातून शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणूनही आवाहन करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, एम के स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला आहे. त्यांनी शरद पवार यांनी राजीनामा का दिला याबाबत माहिती घेतली. राजीनामा मागे घेण्याची दोन्ही नेत्यांची भूमिका आहे. तसे त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलताना म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार आहे. कारण शरद पवार यांनी 6 मेची बैठक 5 मे रोजी घ्या अशी सूचना नेत्यांना केली आहे. समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं पवार यांनी म्हटलं आहे. आपण कार्यकर्त्यांना आणि वरिष्ठांना विचारात घ्यायला हवं होतं. मात्र सर्वांना विचारून निर्णय घेतला असता तर स्वाभाविकपणे त्याला सर्वांनी विरोध केला असता, असेही पवार यांनी म्हटले आहे.

सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी नेत्यांची तीन तास खलबते

दरम्यान, मुंबईत शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची तीन तास खलबते सुरु होती. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे, रोहित पवार यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद न साधताच दोन्ही नेते सिल्व्हर ओकवरुन निघाले. या बैठकीला अजित पवार मात्र उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीमध्ये गटतट नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना, याबाबत अजून चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितले.