ठाणे : राज्यभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथील अमृतनगर येथील 57 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या रुग्णावर उपचार सुरु होते. या रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याची माहिती समोर येत आहे.
ठाण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास 13वर पोहचला आहे. तर ठाणे जिल्ह्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कळवा-मुंब्रा-दिवा येथे वाहनांस प्रतिबंध घालण्यात आला आहे.
कळवा, मुंब्रा, दिवा भागात खासगी वाहनांना आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर सर्व गाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ठाण्यात रविवारी आणखी दोन कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे.
मुंबईत कोरोनारुग्णांचा आकडा 458वर पोहचला आहे. तर आतापर्यंत मुंबईत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात ६, पुण्यात ५, औरंगाबाद, बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, हिंगोली, गोंदिया, सिंधुदुर्गात प्रत्येकी १-१ रुग्ण कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात राज्यात मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक ८१ रुग्ण वाढले, तर पुण्यात ही संख्या १८ने वाढली. औरंगाबादमध्ये ४, अहमदनगरमध्ये ३, कल्याण डोंबिवलीमध्ये २, ठाण्यात २, उस्मानाबादमध्ये १, वसईमध्ये १ आणि दुसऱ्या राज्यातला १ रुग्ण आढळला आहे.
राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 748 झाली असून आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे.