मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहाता राज्यात काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या बाबतीत सगळ्यात वाईट आकडेवारी महाराष्ट्राची आहे. देशातल्या सर्वाधिक कोरोना असलेल्या टॉप टेन जिल्ह्यांमध्ये तब्बल 8 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत.
या 8 जिल्ह्यांमधील ८ हजार ४७४ ऍक्टिव्ह रुग्णांसह पहिल्या नंबरवर पुणे आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर १२ हजार ७२४ रुग्णांसह नागपूर आहे. त्यापाठोपाठ ठाणे १० हजार ४६०, मुंबई ९९७३, अमरावती ५२५९, जळगाव ५०२९, नाशिक ४५२५ आणि औरंगाबाद ४३५३ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे .
तर धुळे, बुलडाणा, नाशिक, पुणे आणि जालन्यामध्ये वेगानं रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईत एका आठवड्यात सील होणा-या बिल्डिंग्सची संख्या २३ टक्क्यांनी वाढली आहे. देशात १ लाख ९० हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी १ लाख फक्त महाराष्ट्रात आहेत.
आणखी महत्त्वाचं म्हणजे पुढच्या दोन आठवड्यांत ही रुग्णसंख्या वाढण्याचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रातली कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे, लोकल सुरू होणं, लग्नसराई आणि नागरिकांचा निष्काळजीपणा कोरोना वाढीला कारणीभूत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रत्येकालाच खबरदारी आणि काळजी घ्यायलाच हवी, नाही तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही....