Dasara Melava: ठाकरे की शिंदे...शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरेंना शिवाजी पार्कचं मैदान मिळण्याची शक्यता आहे. तर आझाद मैदानावर शिवसेना शिंदे पक्षाचा मेळावा होऊ शकतो. यंदा पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटीलही दसरा मेळावा घेणार आहेत. बीडमधील नारायणगडावर जरांगे पाटलांचा मेळावा होणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यातून जरांगे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा. शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे जणू समीकरणंच. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवाजी पार्कसाठी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ झाली होती. यंदाच्या दसरा मेळाव्याला मात्र दादरमधील शिवाजी पार्क मैदान शिवसेना ठाकरे पक्षालाच मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी ठाकरे पक्षानं 8 महिन्यांपूर्वीच बीएमसीकडे अर्ज केलाय. याशिवाय बीएमसीला चार स्मरणपत्रही देण्यात आलेत. दुसरीकडे शिवसेना शिंदे पक्षानं अद्यापही बीएमसीकडे अर्ज केला नसल्याची माहिती आहे. त्यामुळं शिंदेंचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे. शिंदे पक्षानं या दोन्ही मैदानांसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी शिवसेना शिंदे पक्षाला जोरदार टोला लगावलाय.
एकनाथ शिंदेंचं बंड झालं आणि शिवसेनेची दोन शकलं झाली. शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. बंडानंतरच्या पहिल्याच दसरा मेळाव्यात शिंदे विरुद्ध ठाकरे आमनेसामने उभे ठाकले होते. शिवाजी पार्कसाठी ठाकरेंसह शिंदे पक्षानं अर्ज केले होते. मैदानाच्या परवानगीवरूनही शिवसेनेच्या दोन्ही पक्षात खडाजंगी झाली होती.
अखेर बीएमसीनं शिवाजी पार्कसाठी ठाकरे पक्षाला संमती दिली आणि शिंदेंना दसरा मेळावा बीकेसी मैदानावर घ्यावा लागला. त्यानंतर गेल्यावर्षी शिवसेना शिंदे पक्षानं आझाद मैदानावर दसरा मेळावा घेऊन ठाकरेंवर तोफ डागली होती. आता पुन्हा एकदा शिवाजी पार्क ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं आझाद मैदानावरच शिवसेना शिंदे पक्षाचा दसरा मेळावा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याव्यतिरीक्त महाराष्ट्रात यंदा मनोज जरांगे पाटलांच्याही दसरा मेळाव्याची चर्चा आहे. बीडमधील नारायणगडावर जरांगे पाटील दसरा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. नारायणगडावर महंत आणि मराठा समाज बांधवांमध्ये चर्चा झालीय. या बैठकीत जरांगे पाटील दसरा मेळावा घेण्यावर शिक्कामोर्तब झालंय.
मुंबईत ठाकरे, शिंदे...बीडमधील भगवानगडावर पंकजा मुंडे...आणि आता बीडच्या नारायणगडावर जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यांमधून काय राजकीय प्रतिक्रिया उमटणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.