लावणीतच्या नावाखाली अश्लील नृत्य करण्याच्या वादानंतर गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव महाराष्ट्रभर चर्चेत आले आहे. अंगविक्षेप करुन नाचतानाचे गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले आहेत. लावणी सम्राज्ञी असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी गौतमीची कानउघाडणी केली होती. आता आणखी एका कार्यक्रमामुळे गौतमी पाटील चर्चेत आली आहे. सांगलीमध्ये (Sangli) एका लावणी (Lavni) कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलने पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. (Dancer Gautami Patil reacted tragedy in Sangli)
सांगलीमध्ये (Sangli) बेडग या ठिकाणी गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. गौतमीला पाहण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती. यावेळी घरांच्या, शाळेच्या छतावर, झाडावर बसून प्रेक्षक गौतमी पाटीलचा डान्स पाहत होते. याच कार्यक्रमात एका व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. दत्तात्रय विलास ओमासे (44) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याचे समोर आले आहे. गर्दीत दत्तात्रय ओमासे यांच्या डोक्याला मार बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. यानंतर गौतमी पाटीलने पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.
"मला या संदर्भात कोणाचाही फोन आला नाही. मी बातमी वाचल्यानंतर मला याची माहिती मिळाली. ते वयस्कर होते आणि त्यांच्या मृत्यूने मलाही वाईट वाटलं आहे. मला अंदाजच नव्हता की एवढा विषय होईल. मला कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. त्यामुळे मी माझं काम केले. पण हे असं होईल मला तरी वाटलं नव्हतं. माझा डान्स सुरु होता. पण कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला कळालं की एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे," असे गौतमी पाटीलने म्हटलं आहे.